मत्तय 2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)ज्ञानी लोकांचे आगमन 1 हेरोद राजाच्या अमदानीत यहुदियातील बेथलेहेम नगरात येशूच्या जन्मानंतर, पूर्वेकडून काही ज्ञानी पुरुष यरुशलेम येथे येऊन विचारपूस करू लागले, 2 “यहुदी लोकांचा राजा जन्मला आहे, तो कुठे आहे? आम्ही पूर्वेकडे त्याचा तारा पाहिला आणि आम्ही त्याची उपासना करायला आलो आहोत.” 3 हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम अस्वस्थ झाले. 4 त्याने सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे?” 5 ते त्याला म्हणाले, “यहुदियातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याद्वारे असे लिहिले आहे: 6 हे बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस, असे मुळीच नाही. माझ्या इस्राएली लोकांचे नेतृत्व करील असा सरदार तुझ्यातून उदयास येईल.” 7 हेरोदने पूर्वेकडील ज्ञानी लोकांना गुप्तपणे बोलावून, तारा दिसू लागल्याची निश्चित वेळ त्यांच्याकडून काळजीपूर्वक विचारून घेतली. 8 नंतर त्याने त्यांना बेथलेहेमला पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बाळाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याची उपासना करीन.” 9 राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि जो तारा त्यांनी पूर्वेकडे पाहिला होता, तो बाळ होते, त्या जागेवर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे मार्गक्रमण करत राहिला. 10 तो तारा त्यांना दिसला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 11 त्या घरात गेल्यावर ते बाळ त्याची आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी पाया पडून त्याची आराधना केली. त्यांच्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ह्या भेटवस्तू त्यांनी त्याला अर्पण केल्या. 12 मात्र ‘हेरोदकडे परत जाऊ नका’, अशी सूचना त्यांना स्वप्नात मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने त्यांच्या देशास निघून गेले. मिसर देशाला पलायन 13 ते गेल्यावर प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, मुलाला व त्याच्या आईला घेऊन मिसर देशास पळून जा. मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे.” 14 योसेफ उठला आणि बाळ व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला. 15 हेरोदच्या मृत्यूपर्यंत तो तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे”, हे भाकीत पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मुलांची कत्तल 16 ज्ञानी लोकांनी आपल्याला फसवले, हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि ज्ञानी पुरुषांकडून काळजीपूर्वक विचारून घेतलेल्या वेळेनुसार त्याने बेथलेहेममध्ये व आसपासच्या परिसरात माणसे पाठवली व त्यांच्याकडून जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे मुलगे होते त्या सर्वांना ठार मारले. 17 यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे: 18 राम्हा येथे रडणे व मोठा आकांत ऐकण्यात आला; राहेल आपल्या मुलांकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून काही केल्या तिचे सांत्वन होईना. मिसर देशाहून परतणे 19 हेरोद मरण पावल्यावर, प्रभूचा दूत मिसर देशात गेलेल्या योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, 20 “ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळाचा जीव घ्यायला जे टपले होते, ते मेले आहेत.” 21 तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत गेला. 22 परंतु अर्खेलाव त्याचे वडील हेरोद ह्याच्या जागी यहुदियात राज्य करत आहे, असे कळल्यावर योसेफ तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना मिळाल्याप्रमाणे तो गालील प्रांतात निघून गेला. 23 ‘त्याला नासरेथकर म्हणतील’, हे जे ख्रिस्ताविषयी संदेष्ट्याद्वारे भाकीत करण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून तेथे तो नासरेथ नावाच्या नगरात जाऊन राहिला. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India