लूककृत शुभवर्तमान 3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा संदेश 1 सम्राट तिबिर्य ह्याच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहुदियाचा राज्यपाल होता. हेरोद गालीलचा राज्यकर्ता, त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनीती ह्या प्रांतांचा राज्यकर्ता व लूसनिय अबिलेनेचा राज्यकर्ता होता. 2 हन्नास व कयफा हे उच्च याजक असताना जखऱ्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. 3 तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत फिरला. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले, ते असे: 4 अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू आली, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. 5 प्रत्येक दरी भरली जाईल. प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वळणावळणाचे रस्ते सरळ केले जातील. खडबडीत वाटा समतल केल्या जातील 6 आणि सर्व लोक देवाने केलेले तारण पाहतील. 7 जे लोक बाप्तिस्मा घ्यायला त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो, सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले? 8 तुमचा पश्चात्ताप दिसून येईल अशी सत्कृत्ये करा आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे आपल्या मनात म्हणू नका कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामसाठी मुले निर्माण करायला देव समर्थ आहे! 9 आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड उचललेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते ते तोडून अग्नीत टाकले जाईल.” 10 लोकसमुदाय त्याला विचारीत असे, “तर मग आम्ही काय करावे?” 11 तो त्यांना उत्तर देत असे, “ज्याच्याजवळ दोन सदरे आहेत, त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, त्याने त्यात दुसऱ्यांना सहभागी करावे.” 12 जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला आले व त्याला त्यांनी विचारले, “गुरुजी, आम्ही काय करावे?” 13 त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका.” 14 सैनिकांनी त्याला विचारले, “आम्ही काय करावे?” त्याने त्यांना सांगितले, “कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड रचू नका, तर आपल्या पगारात समाधानी असा.” 15 त्या वेळी लोक प्रतीक्षा करत होते व हाच ख्रिस्त असेल काय, असा सर्व जण योहानविषयी आपल्या मनात विचार करीत असत. 16 योहान त्या सर्वांना उत्तर देत असे, “मी तर तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडायलाही मी पात्र नाही, तो येत आहे. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देइल. 17 आपले खळे अगदी स्वच्छ करायला व गहू आपल्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे. मात्र भूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” 18 तसेच इतर अनेक प्रकारे लोकांना आवाहन करीत तो शुभवर्तमानाची घोषणा करीत असे. 19 मात्र त्याने राज्यकर्ता हेरोद ह्याला त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे 20 हेरोदने ह्या सर्वांहून अधिक मोठे दुष्कर्म केले; ते म्हणजे त्याने योहानला तुरुंगात कोंडून ठेवले. येशूचा बाप्तिस्मा 21 तेथील सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यावर येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेले, 22 पवित्र आत्मा दृश्य रूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.” येशूचे पूर्वज 23-38 येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफचा पुत्र असे समजत. योसेफचे पूर्वज अनुक्रमे पुढीलप्रमाणे:एली, मत्ताथ, लेवी, मल्खी, यन्नया, योसेफ, मत्तिथा, आमोस, नहूम, हेस्ली, नग्गय, महथा, मत्तिथा, शिमयी, योसेख, योदा, योहानान, रेश, जरुब्बाबेल, शल्तिएल, नेरी, मल्खी, अद्दी, कोसाम, एल्मदाम, एर, येशू, अलियेजर, योरीम, मत्ताथ, लेवी, शिमोन, यहुदा, योसेफ, योनाम, एल्याकीम, मलआ, मिन्ना, मत्ताथ, नाथान, दावीद, इशाय, ओबेद, बलाज, सल्मोन, नहशोन, अम्मीनादाब, आद्मीन, अर्णय, हेस्रोन, पेरेस, यहुदा, याकोब, इसहाक, अब्राहाम, तेरह, नाहोर, सरूग, रऊ, पेलेग, एबर, शेलह, केनान, अर्पक्षद, शेम, नोहा, लामेख, मथूशलह, हनोख, यारेद, महललेल, केनान, अनोश, सेथ आणि देवपुत्र आदाम. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India