Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

योहान 13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


येशू शिष्यांचे पाय धुतो

1 ओलांडण सणापूर्वी असे झाले की, ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आता आली आहे, हे येशूने ओळखले. ह्या जगातील आप्तजनांवर त्याची जी प्रीती होती ती त्याने शेवटपर्यंत केली.

2 शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याच्या मनात येशूचा विश्‍वासघात करावा, असा विचार सैतान आधीच घालून चुकला होता.

3 आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे व आपण देवाकडून आलो आहोत व देवाकडे जात आहोत हे जाणून

4 रात्रीचे भोजन होत असताना येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपले बाह्य वस्त्र काढले व एक टावेल घेऊन आपल्या कमरेला बांधला.

5 नंतर घंगाळात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या टावेलने पुसू लागला.

6 तो पेत्राकडे आला, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, आपण माझे पाय धुता काय?”

7 येशूने त्याला उत्तर दिले, “मी जे करत आहे ते तुला आता कळणार नाही. ते तुला पुढे कळेल.”

8 पेत्र त्याला म्हणाला, “मी तुम्हांला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्याबरोबर वाटा मिळणार नाही.”

9 पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, तसे असेल, तर माझे पायच नव्हे, तर हात व डोकेही धुवा.”

10 येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे, त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.”

11 आपला विश्‍वासघात करणारा कोण आहे, हे त्याला अगोदरच ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, “तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.’

12 त्यांचे पाय धुतल्यावर व आपले बाह्य वस्त्र चढवून पुन्हा खाली बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता काय केले, हे तुम्हांला समजले काय?

13 तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते योग्य आहे कारण मी तसा आहे.

14 प्रभू व गुरू असूनही मी तुमचे पाय धुतले. मग तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.

15 जसे मी तुमच्यासाठी केले, तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे.

16 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही.

17 जर ह्या गोष्टी तुम्हांला समजल्या, तर त्या केल्याने तुम्ही किती धन्य ठराल!

18 मी तुम्हां सर्वांविषयी बोलत नाही; जे मी निवडले, ते मला माहीत आहेत. तरी पण ‘जो माझी भाकर खातो, तोच माझ्यावर उलटतो’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.

19 जेव्हा हे घडेल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे म्हणून हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो.

20 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी ज्याला पाठवतो, त्याचा जो स्वीकार करतो तो माझाही स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो.”


विश्वासघातकी कोण?

21 असे बोलल्यावर येशू आत्म्यात विव्हळला व उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”

22 तो कोणाविषयी बोलत असावा, ह्या संभ्रमात शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.

23 ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता.

24 तो कोणाविषयी बोलतो, हे विचार, असे पेत्राने त्या शिष्याला खुणावून सांगितले.

25 तेव्हा तो येशूच्या उराशी टेकलेला होता तसाच येशूला म्हणाला, “प्रभो, तो कोण आहे?”

26 येशूने उत्तर दिले, “मी ज्याला भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.” त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याला दिला.

27 भाकरीचा तुकडा दिल्याबरोबर सैतान त्याच्यात शिरला. येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे, ते लवकर करून टाक.”

28 मात्र त्याने त्याला असे कशासाठी सांगितले, हे भोजनास बसलेल्यांतील इतर कोणाला समजले नाही.

29 यहुदाजवळ पैशाची थैली होती म्हणून सणासाठी जे आवश्यक आहे ते विकत घ्यावे, किंवा गरिबांना काहीतरी द्यावे, असे येशू सांगत आहे, असे काही शिष्यांना वाटले.

30 भाकरीचा तुकडा घेतल्यावर यहुदा लगेच बाहेर गेला. ती रात्रीची वेऴ होती.


नवीन आज्ञा

31 यहुदा बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचे वैभव प्रकट झाले आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे

32 आणि जर त्याच्याद्वारे देवाचे वैभव प्रकट झाले आहे, तर देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील. तो त्याचा लवकरच गौरव करील.

33 मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर असेन. तुम्ही मला शोधाल परंतु जसे मी यहुद्यांना सांगितले तसे तुम्हांलाही आता सांगतो, जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही,

34 मी तुम्हांला एक नवीन आज्ञा देतो:तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा.

35 तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”


पेत्र येशूला नाकारील असे भाकीत

36 पेत्राने येशूला विचारले, “प्रभो, आपण कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “मी जेथे जातो, तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील.”

37 पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, मला आपल्यामागे आता का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे.”

38 येशूने त्याला उत्तर दिले, “माझ्यासाठी तू स्वतःचा प्राण देशील काय? मी तुला खातरी पूर्वक सांगतो, तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan