Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

योहान 10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


चांगला मेंढपाळ

1 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो मेंढवाड्यात दारातून न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असतो.

2 जो दारातून आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ असतो.

3 त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो.

4 तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात कारण ती त्याची वाणी ओळखतात.

5 ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, उलट ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाहीत.”

6 हा दाखला येशूने त्यांना सांगितला. परंतु येशू त्यांना जे सांगत होता, ते त्यांना समजले नाही.

7 म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी मेंढरांसाठी दार आहे.

8 जे माझ्या पूर्वी आले, ते सर्व चोर व लुटारू होते. त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही.

9 मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला कुरण सापडेल.

10 चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन व तेही परिपूर्ण जीवन मिळावे म्हणून आलो आहे.

11 मी चांगला मेंढपाळ आहे, चांगला मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो.

12 जो मेंढपाळ नसेल व मोलकरी असेल, ज्याची स्वतःची मेंढरे नसतील, तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जाईल आणि मग लांडगा मेंढरांवर झडप घालून त्यांची दाणादाण उडवील.

13 मोलकरी पळून जाईल कारण तो मोलकरीच असतो आणि त्याला मेंढरांची काळजी नसते.

14-15 मी चांगला मेंढपाळ आहे. जसे पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी माझा प्राण देतो.

16 ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी इतर मेंढरे आहेत. तीदेखील मला आणली पाहिजेत, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.

17 मी माझा प्राण देतो तो पुन्हा परत घेण्याकरता, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.

18 तो माझ्याकडून कोणी घेत नाही, तर मी स्वतःहून तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो पुन्हा परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्याकडून मिळाली आहे.”

19 ह्या शब्दांमुळे यहुदी अधिकाऱ्यांत पुन्हा फूट पडली.

20 त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे, त्याचे तुम्ही का ऐकता?”

21 इतर म्हणाले, “ही वचने भूतग्रस्ताची नाहीत. भुताला आंधळ्यांना दृष्टी देता येते काय?”

22 ते हिवाळ्याचे दिवस होते व यरुशलेममध्ये मंदिरसमर्पणाचा सोहळा साजरा केला जात होता.

23 मंदिरात शलमोनच्या देवडीत येशू फिरत होता.

24 लोकांनी त्याला घेरले व विचारले, “तुम्ही कुठपर्यंत आम्हांला संभ्रमात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल, तर आम्हांला उघडपणे सांगा.”

25 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो, ती माझ्याविषयी साक्ष देतात.

26 मात्र तुम्ही विश्वास ठेवणार नाही कारण मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.

27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात.

28 मी त्यांना शाश्वत जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातांतून कोणी हिसकावून घेणार नाही.

29 माझ्या पित्याने मला जे दिले आहे ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातांतून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.

30 मी आणि पिता एक आहोत.”


यहुदी अधिकाऱ्यांनी दाखविलेले शत्रुत्व

31 तेव्हा यहुदी लोकांनी त्याला मारण्यासाठी पुन्हा दगड उचलले.

32 येशू त्यांना म्हणाला, “पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये मी तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यांकरता तुम्ही मला दगड मारत आहात?”

33 त्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हांला दगड मारत नाही, तर दुर्भाषणासाठी! कारण तुम्ही केवळ मानव असून स्वतःला देव म्हणवता.”

34 येशूने त्यांना म्हटले, ““तुम्ही देव आहात, असे मी म्हणतो’, हे तुमच्या धर्मशास्त्रात लिहिले नाही काय?

35 आणि ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि धर्मशास्त्रलेखाचा भंग होत नाही,

36 तर ज्याला पित्याने पवित्र कार्यासाठी निवडून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटले म्हणून तुम्ही दुर्भाषण करता असे म्हणता काय?

37 मी पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका.

38 परंतु जर मी ती करतो, तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी निदान त्या कृत्यांवर विश्वास ठेवा. या मागचा हेतू हा की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे, हे तुम्ही ओळखून व समजून घ्यावे.”

39 ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले परंतु तो त्यांच्या हातांतून सुटला.

40 तो पुन्हा यार्देन नदीच्या पलीकडे, योहान सुरुवातीला बाप्तिस्मा देत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला.

41 तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले व ते म्हणाले, “योहानने काही चिन्ह केले नाही खरे, परंतु योहानने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”

42 तेथे अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan