याकोब 3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)जिभेवर ताबा 1 माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण शिक्षक म्हणून आपला अधिक कडक न्याय केला जाईल, हे तुम्हांला माहीत आहे. 2 आपण सगळेच अनेकदा चुका करतो. मात्र कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. 3 घोड्याने आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याला आपण हवे तसे फिरवतो. 4 किंवा तारू पाहा, ते एवढे मोठे असते व प्रचंड वाऱ्याने लोटले जात असते, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे तो अगदी लहानशा सुकाणूने ते फिरवतो. 5 जिभेचे तसेच आहे:जीभ लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते! 6 जीभ ही आग आहे. ती अनीतीचे घर आहे, आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती आपल्या सृष्टिचक्राला नरकाग्नीने पेटवते. 7 श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या सर्वांना मनुष्य वश करू शकतो व शकला आहे 8 परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे. 9 आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो. 10 एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत! 11 झऱ्याच्या एकाच उगमातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? 12 माझ्या बंधूंनो, अंजिराला ऑलिव्ह फळे किंवा द्राक्षवेलीला अंजीर येऊ शकत नाहीत; तसेच खाऱ्या पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी निघणे शक्य नाही. खोटे व खरे ज्ञान 13 तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत. 14 पण तुमच्या मनात कटु मत्सर व स्वार्थी महत्त्वकांक्षा आहे तर सुज्ञतेचा ताठा मिरवून सत्याविरुद्ध पाप करू नका. 15 ही सुज्ञता वरून उतरत नाही, तर ती ऐहिक, अध्यात्माविरुद्ध व सैतानाकडली आहे. 16 जेथे मत्सर व स्वार्थी वृत्ती आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक प्रकारचे कुकर्म आहे. 17 परंतु वरून येणारी सुज्ञता ही मुळात शुद्ध असते. शिवाय ती शांतिप्रिय, सौम्य व स्नेहवर्धक असते; ती करुणायुक्त असून तिला सत्कृत्यांचे पीक येते; ती पक्षपात व ढोंगबाजी यांपासून अलिप्त असते 18 आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India