Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इब्री 9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


जुने पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक

1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते.

2 पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात दीपस्तंभ, टेबल व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्र स्थान म्हटले आहे;

3 दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता;

4 त्यात सोन्याचे धुपाटणे व चहूबाजूंनी सोन्याने मढविलेली कराराची पेटी होती; ह्या पेटीत मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, पालवी फुटलेली अहरोनची काठी व कराराच्या दोन पाट्या होत्या

5 तेजस्वी करूबिम दयासन आच्छादीत होते; परंतु याविषयी सविस्तर बोलण्याची ही वेळ नाही.

6 ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केली असता याजक धार्मिक विधी करण्यास पहिल्या मंडपात नियमितपणे जात असत;

7 परंतु दुसऱ्यांत प्रमुख याजक वर्षांतून एकदा एकटाच जात असे तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या नकळत केलेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करीत असत, ते घेतल्याशिवाय जात नसे.

8 ह्यावरून पवित्र आत्मा दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे, तोपर्यंत परमपवित्र स्थानाचा मार्ग प्रकट झाला नाही.

9 तो मंडप वर्तमानकाळासाठी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करावयास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात.

10 खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांच्यासह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत. ते नवीन व्यवस्था प्रस्थापित होईपर्यंत लावून दिले आहेत.


ख्रिस्ताच्या बलिदानातील शुद्धिकारक सामर्थ्य

11 ख्रिस्त हा उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक म्हणून आला व जो मंडप हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व परिपूर्ण मंडपातून

12 आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने शाश्वत मुक्ती सिद्ध केली.

13 बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतकी पवित्र करतात,

14 तर सार्वकालिक आत्म्याच्यायोगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या उपासनेसाठी निरुपयोगी विधींपासून किती अधिक प्रमाणात शुद्ध करील?

15 ह्याच कारणाकरिता ख्रिस्त नव्या कराराचा मध्यस्थ आहे त्यामुळे पाचारण झालेल्यांना शाश्वत वारशाचे अभिवचन मिळावे. हे शक्य आहे कारण पहिल्या कराराखाली झालेल्या उ्रंघनापासून खंडणी भरून मुक्ती मिळावी म्हणून एक मृत्यू झालेला आहे.

16 मृत्युपत्र असले की, मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे.

17 मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्रकर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात येणार नाही.

18 म्हणून पहिल्या कराराचीही स्थापना रक्तावाचून झाली नाही.

19 नियमशास्त्रानुसार सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर, एजोब वनस्पतीची डहाळी व त्यांबरोबर वासरांचे व बकऱ्यांचे रक्त घेऊन नियमशास्त्राच्या ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले:

20 “तुम्ही पाळावा म्हणून परमेश्वराने जो करार केला, त्यासंबंधीचे हे रक्त आहे’,

21 तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले.

22 नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा मिळत नाही.


ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व

23 स्वर्गातील गोष्टींच्या प्रतिकृती अशा प्रकारे शुद्ध होणे आवश्यक होते; परंतु प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यांहून अधिक चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्यक होते.

24 खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान; ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला

25 आणि जसे प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन पवित्र स्थानात जातात, तसे ख्रिस्ताला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते;

26 तसे असते, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो युगांच्या समाप्तीस एकदाच आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे.

27 ज्याअर्थी माणसांना, एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,

28 त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan