Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इब्री 8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


प्रभू येशूचे याजकपण श्रेष्ठ

1 सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवशाली सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला मिळाला आहे.

2 तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने उभारलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे.

3 प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्याकरिता नेमलेला असतो, म्हणून आपल्या याजकाजवळही अर्पण करण्याकरिता काहीतरी असणे अगत्याचे आहे.

4 तो पृथ्वीवर असता, तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत;

5 ‘पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी बाळग’, ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता, तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे यहुदी लोकांचे याजकही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करितात.

6 परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, तो अधिक चांगल्या अभिवचनाने स्थापन झालेला असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ याजकीय सेवाकार्य येशूला मिळाले आहे.

7 तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा आवश्यक नसता.

8 परंतु लोकांना दोष लावून परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात इस्राएलचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;

9 मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.

10 परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील;

11 तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे कोणीही आपल्या सहनागरिकाला सांगणार नाही आणि कुणालाही आपल्या बंधूला शिकवावे लागणार नाही; कारण त्यांतील लहानापासून थोरापर्यंत, सर्व मला ओळखतील;

12 मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे मुळीच आठवणार नाही.

13 त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते लवकरच नाहीसे होईल.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan