Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इब्री 1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


प्रस्तावना

1 प्राचीन काळी देव आपल्या पूर्वजांशी अंशाअंशानी व निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे बोलला.

2 परंतु ह्या शेवटच्या काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याच्याद्वारे विश्व निर्माण केले आणि त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले.

3 तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे.


देवाचा पुत्र, देवदूतांपेक्षा श्रेष्ठ

4 पुत्राला देवाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ केले आहे - अगदी त्यांच्या नावापेक्षा अधिक श्रेष्ठ नाव त्याला दिले आहे तसे.

5 कारण त्याने त्याच्या कोणत्याही देवदूताला कधी असे म्हटले? तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल.

6 परंतु तो प्रथम जन्मलेल्या पुत्राला जगात आणताना म्हणतो: देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत.

7 मात्र देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वारे आणि आपले सेवक अग्निज्वाळा असे करतो.

8 परंतु पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगांचे आहे आणि तुझा राजदंड न्यायाचा राजदंड आहे.

9 तुला न्यायाची चाड आणि वाइटाचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ अशा आनंददायक तेलाचा अभिषेक तुला केला आहे.

10 तो असेही म्हणाला, हे प्रभो, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत;

11 ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी कपड्यांसारखी जीर्ण होतील;

12 तू त्यांस झग्यासारखे गुंडाळशील आणि ती कपड्यांप्रमाणे बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत.

13 देवाने त्याच्या कोणत्याही देवदूताविषयी कधी असे म्हटले? मी तुझ्या वैऱ्यांना तुझ्या पायांखाली ठेवेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.

14 तर मग देवदूत कोण आहेत? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले, ते सर्व परमेश्वराचे सेवक नाहीत काय?

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan