Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गलतीकरांना 6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


व्यावहारिक बोध

1 बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात, ते तुम्ही अशा माणसाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. मात्र तुम्हीदेखील मोहात पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.

2 एकमेकांची ओझी वाहण्याकरिता हातभार लावा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.

3 आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.

4 प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या वर्तनाचे परीक्षण करावे म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.

5 प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.

6 ज्याला ख्रिस्ती संदेशाचे शिक्षण दिले जात आहे, त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या गोष्टीत सहभागी करावे.

7 फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल.

8 जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावाकडून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्याकडून शाश्वत जीवन हे पीक मिळेल.

9 म्हणून चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, आपण खचलो नाही तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.

10 तर मग आपणाला ज्याप्रमाणे संधी मिळेल, त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः श्रद्धेमुळे जे आपल्या परिवाराचे सदस्य झाले आहेत, त्यांचे हित साधावे.


समारोप

11 पाहा, मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हांला लिहीत आहे!

12 जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या क्रुसामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.

13 सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तुमची सुंता व्हावी असा त्यांचा आग्रह अशासाठी असतो की, तुम्ही त्यांच्या शारीरिक विधीचे पालन केले, अशी त्यांना बढाई मारता यावी.

14 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या क्रुसाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; कारण त्याच्या क्रुसाद्वारे जगाने मला क्रुसावर खिळले आहे व मी जगाला क्रुसावर खिळले आहे.

15 सुंता करणे किंवा न करणे याला काही अर्थ नाही परंतु नवी उत्पत्ती हेच सर्व काही आहे.

16 जितके लोक ह्या नियमाने वागतील तितक्या लोकांना व देवाच्या इस्राएलला शांती व दया मिळो.

17 ह्यापुढे कोणी मला त्रास देऊ नये कारण माझ्या शरीरावर मी येशूच्या खुणा धारण केल्या आहेत.

18 बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो. आमेन.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan