Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इफिसकरांस 3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


सेवाकार्यासाठी पौलाची रवानगी

1 ह्या कारणामुळे तुमच्या यहुदीतर लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान झालेला मी पौल परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

2 मला तुमच्यासाठी देवाची कृपा प्राप्त झाली. तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही निश्चितच ऐकले आहे.

3 म्हणजे प्रकटीकरणाद्वारे मला रहस्य कळविले गेले, त्याप्रमाणे मी जे वर थोडक्यात लिहिले आहे,

4 ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाले ते तुम्हांला समजेल.

5 ते रहस्य जसे आता आत्म्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखविले आहे, तसे ते इतर पिढ्यांना कळविण्यात आले नव्हते.

6 ते रहस्य हे की, यहुदीतर लोक ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, एकशरीर व अभिवचनाचे सहभागी आहेत.

7 देवाच्या सामर्थ्याच्या कृतीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले, त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो आहे.

8 सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे

9 व ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवामध्ये युगादिकालापासून गुप्त ठेवलेल्या रहस्याची व्यवस्था कशी होणार आहे, हे सर्वांना प्रकट करून दाखवावे.

10-11 ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे.

12 ख्रिस्तामध्ये श्रद्धेद्वारे आत्मविश्वासाने व खातरीने परमेश्वराच्या सहवासात प्रवेश मिळविण्याचे धैर्य आपल्याला मिळाले आहे.

13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हाला भूषणावह आहेत.


ख्रिस्ताने अंतःकरणामध्ये वास करावा म्हणून प्रार्थना

14-15 म्हणून स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबास ज्या पित्यावरून खरे नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की,

16 त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीनुसार तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे.

17 ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वसती करावी. ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे व्हावे,

18 ज्यावरून त्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची व खोली किती;

19 हे तुम्ही सर्व पवित्र लोकांसह समजून घ्यावे व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावी, म्हणजेच तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.

20 आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांच्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने सिद्धीस न्यावयास जो समर्थ आहे,

21 त्याचा ख्रिस्तमंडळीमध्ये व ख्रिस्त येशूमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुगे गौरव होवो! आमेन.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan