Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इफिसकरांस 2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


देवाच्या कृपेने तारण

1 तुम्ही आपले अपराध व आपली पापे ह्यांमुळे पूर्वी मृत झाला होता.

2 त्या वेळी तुम्ही पापांमध्ये चालत होता, अर्थात, ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा दुरात्मा ह्याच्या धोरणाप्रणाणे चालत होता.

3 खरे म्हणजे आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. आम्हीदेखील आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे वागत क्रोधासाठी नेमलेले होतो.

4 परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे,

5 ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे

6 आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गलोकात राज्य करण्यासाठी उठविले.

7 ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले.

8 देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे.

9 कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.

10 आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.


यहुदी व यहुदीतर लोकांचे ख्रिस्तामध्ये ऐक्य

11 ज्यांची शारीरिक सुंता झालेली आहे व जे स्वतःला सुंता झालेले असे म्हणवून घेत असत अशा यहुदी लोकांकडून तुम्ही पूर्वी जन्माने यहुदीतर लोक म्हणविले जात होता; म्हणजेच शरीराची सुंता न झालेले म्हणून ओळखले जात होता, हा तुमचा पूर्वेतिहास लक्षात आणा.

12 तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएल राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारांना परके, आशाहीन व देवाविना असे जीवन जगत होता.

13 परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्तायोगे जवळचे झाला आहात;

14 कारण तो आपली साक्षात शांती आहे, त्याने दोघांना एक केले आणि मधली भिंत पाडली.

15 त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले, हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, ह्यासाठी की, स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी,

16 व त्याच्या क्रुसावरील बलिदानाने दोघांतील वैर नाहीसे करून दोघांना एक शरीर करून दोघांचा देवाशी समेट करावा.

17 त्याने येऊन जे तुम्ही दूर होता, त्या तुम्हांला आणि जे जवळ होते त्या यहुदी लोकांनाही शांतीचे शुभवर्तमान सांगितले.

18 त्याच्याद्वारे आत्म्याच्यायोगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.

19 तर मग तुम्ही आत्तापासून परके व उपरे नाही, पवित्र लोकांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घराण्यातील लोक आहात.

20 प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्हीदेखील रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे.

21 त्याच्यामध्ये सबंध इमारत एकत्र जोडली जाते व ती प्रभूला समर्पित केलेले मंदिर बनते.

22 देवाने पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये वसती करावी म्हणून प्रभूमध्ये तुम्हीदेखील इतरांबरोबर एकत्र उभारले जात आहात.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan