Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

कलस्सै 1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


शुभेच्छा

1 कलस्सै येथील पवित्र लोकांना म्हणजे ख्रिस्तामधील श्रद्धावंत बंधुजनांना देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:

2 देव आपला पिता तुम्हांला कृपा व शांती देवो.

3 जेव्हा आम्ही तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करतो तेव्हा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याला धन्यवाद देतो;

4 कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमचा विश्वास व सर्व पवित्र लोकांवरील तुमची प्रीती ह्यांविषयी ऐकले आहे.

5 जेव्हा खरा संदेश म्हणजेच शुभवर्तमान प्रथम तुमच्याकडे पोहोचले, तेव्हा ही आशा तुमच्यासाठी स्वर्गात सुरक्षित राखून ठेवण्यात आली आहे.

6 तुम्ही हे शुभवर्तमान ऐकले व खरेपणाने त्या दिवसापासून जसे तुमच्यामध्ये तसेच सर्व जगातही हे शुभवर्तमान फळ देत आहे व पसरत चालले आहे. तुम्ही देवाची कृपा सत्यस्वरूपात जाणून घेतली आहे.

7 आमचा प्रिय सहकारी दास, एपफ्रास हा आमच्या वतीने तुमच्यासाठी ख्रिस्ताचा विश्वासू प्रसेवक असून त्याच्याकडून तुम्ही ही कृपा जाणून घेतली.

8 पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेल्या प्रीतीविषयी त्याने आम्हांला कळविले आहे.

9 म्हणूनच तुमच्याविषयी आम्ही ऐकले तेव्हापासून आम्ही सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत की, त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञान व आध्यात्मिक सुज्ञता व समज तुम्हांला प्राप्त होवो.

10 अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला प्रसन्न करण्याकरता त्याला शोभेल असे वागावे; म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाविषयीच्या पूर्ण ज्ञानात तुमची वृद्धी व्हावी.

11 त्याच्या गौरवशाली सामर्थ्याद्वारे तुम्ही सर्व प्रकारच्या शक्तीने सशक्त व्हावे ज्यामुळे सर्व काही आनंदाने सहन करण्याकरिता तुम्हांला धीर व सोशिकपणा मिळावा

12 आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र लोकांसाठी राखून ठेवलेल्या वतनाचे भागीदार होण्यासाठी पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत.

13 त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे.

14 त्या पुत्रामध्ये, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांबद्दल आपल्याला क्षमा मिळाली आहे.


प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य

15 येशू अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व निर्मितीत प्रथम जन्मलेला आहे;

16 कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी जे काही आहे; ते सर्व त्याच्याद्वारे निर्माण झाले. सर्व विश्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.

17 तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही एकत्रित राहते.

18 तो त्याच्या शरीराचे म्हणजे ख्रिस्तमंडळीचे मस्तक व उगमस्थान आहे. तो मृतांतून प्रथम जन्मलेला आहे. अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे;

19 कारण पित्याला हे आवडले की, त्याच्यामध्ये सर्व परिपूर्णता राहावी.

20 म्हणूनच पुत्राद्वारे साऱ्या गोष्टींचा त्याने स्वतःशी समेट घडवून आणला. त्याच्या क्रुसावरील रक्ताद्वारे शांती घडवून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे त्या सर्वांचा - मग ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो

21 आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता,

22 परंतु आता त्याने स्वतःच्या पुत्राच्या शारीरिक मरणाद्वारे तुमचा समेट केला आहे, ह्यासाठी की, त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे त्याच्या सहवासात आणावे.

23 अर्थात, विश्वासात स्थिर व अढळ राहून जे शुभवर्तमान तुम्ही ऐकले, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत ज्याची घोषणा झाली व ज्याचा मी पौल, प्रसेवक झालो आहे, त्याच्या आशेपासून तुम्ही ढळता कामा नये.


पौल - ख्रिस्तमंडळीचा प्रसेवक

24 तुमच्यासाठी माझ्या दुःखांमध्ये मी आनंद मानतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे, ते मी माझ्या देहाने, त्याचे शरीर म्हणजे ख्रिस्तमंडळीसाठी भरून काढत आहे.

25 देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी ख्रिस्तमंडळींचा प्रसेवक झालो आहे.

26 जे रहस्य युगानुयुगे पिढ्यान्पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र लोकांकरता ते प्रकट झाले आहे. ते हे वचन होय.

27 हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.

28 ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक माणसाने परिपूर्ण झालेले असे आम्हांला सादर करता यावे म्हणून आम्ही सर्वांना ख्रिस्ताची घोषणा करतो, प्रत्येक माणसाला सावध करतो व प्रत्येक माणसाला सर्व प्रकारच्या ज्ञानाने सुशिक्षित करतो.

29 त्याची जी शक्ती माझ्यामध्ये जोमाने कार्य करत आहे, तिच्या आधारे हे सिद्ध करण्यासाठी मी झटून श्रम करीत आहे.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan