Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


सात साहाय्यकांची निवड

1 काही दिवसांनंतर श्रद्धावंतांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहुदी लोकांची स्थानिक हिब्रू लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली कारण रोजच्या दानधर्म वाटणीत त्यांच्या मते त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.

2 तेव्हा बारा प्रेषितांनी श्रद्धावंतांना बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याकडे दुर्लक्ष करून पंक्‍तिसेवेकडे लक्ष पुरवावे, हे ठीक नाही.

3 तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात आदरणीय पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू.

4 म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”

5 हा विचार सर्व लोकांना पसंत पडला आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असलेल्या स्तेफनबरोबर फिलिप, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व अंत्युखिया येथील यहुदीमतानुसारी नीकलाव ह्यांची निवड केली.

6 त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर सादर केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.

7 अशा प्रकारे देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाटयाने वाढत गेली आणि याजकवर्गांतीलही पुष्कळ लोकांनी ह्या श्रद्धेचा स्वीकार केला.


स्तेफनवर ह्रा

8 परमेश्वराची कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण झालेला स्तेफन लोकांत मोठे चमत्कार व चिन्हे करीत असे.

9 मात्र लिबिर्तिन ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघातील लोकांच्या प्रार्थनामंदिरातील काही जण तसेच कुरेनेकर आणि आलेक्सांद्रिया येथील काही यहुदी लोक ह्यांनी त्याला विरोध केला. हे लोक व किलिकिया व आसिया या प्रदेशातील यहुदी लोक स्तेफनबरोबर वितंडवाद घालू लागले.

10 पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता, त्याला ते तोंड देऊ शकत नव्हते.

11 म्हणून त्यांनी काही लोकांना लाच देऊन ‘आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले’, असे म्हणण्यास सांगितले.

12 अशा प्रकारे त्यांनी अनेक लोकांना आणि वडीलजनांना व शास्त्रीजनांना चिथविले. त्यांनी स्तेफनवर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले.

13 नंतर त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, “हा माणूस नेहमी ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलत असतो.

14 आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, नासरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला दिलेले परिपाठ बदलून टाकील.”

15 तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण स्तेफनकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख एखाद्या देवदूताच्या मुखासारखे दिसले.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan