प्रेषित 3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे 1 एके दिवशी पेत्र व योहान हे दुपारी तीनच्या प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात गेले. 2 तेथे जन्मापासून पांगळा असलेला एक माणूस होता. मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागता यावी म्हणून त्याला दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. 3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. 4 त्यांनी त्याला निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.” 5 त्यांच्याकडून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे पाहिले. 6 परंतु पेत्र म्हणाला, “सोने चांदी माझ्याजवळ नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग.” 7 त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले तेव्हा त्याच्या पायात व घोट्यात तत्काळ बळ आले, 8 तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि उड्या मारत व देवाची स्तुती करत तो त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. 9 सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. 10 मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच, हे त्यांनी ओळखले, तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडले त्यावरून सर्वांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. पेत्राचे मंदिरातील भाषण 11 पेत्र व योहान ह्यांच्या सहवासात तो असताना लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. 12 हे पाहून पेत्राने लोकांना विचारले, “अहो इस्राएली लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? आमच्याकडे निरखून का पाहता? आम्ही आमच्या शक्तीने किंवा धार्मिकतेने ह्याला चालावयास लावले, असे तुम्ही समजता काय? 13 अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने त्याचा सेवक येशू ह्याचा गौरव केला आहे. मात्र तुम्ही त्याला अधिकाऱ्यांच्या हाती सोपविले. पिलातने त्याला सोडून देण्याचे ठरवले असतानाही त्याच्यासमक्ष तुम्ही येशूला नाकारले. 14 तो पवित्र व नीतिमान होता परंतु त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी मनुष्य आम्हांला द्या अशी मागणी केली. 15 तुम्ही जीवनाच्या अधिपतीला ठार मारले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले, ह्याचे आम्ही साक्षीदार आहोत. 16 त्याच्याच नावावरील विश्वासामुळे व त्याच्याच नावाच्या सामर्थ्याने ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला सुदृढ केले आहे. त्याच्यावरील श्रद्धेने ह्याला तुम्हां सर्वांसमक्ष हे स्वास्थ्य प्राप्त झाले आहे. 17 बंधूंनो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले, ते अज्ञानामुळे केले, हे मी जाणून आहे. 18 ख्रिस्ताने दुःख सहन करावे, असे जे सर्व संदेष्ट्यांद्वारे देवाने पूर्वी सांगितले होते, ते त्याने अशा प्रकारे पूर्ण केले. 19 तुमची पापे माफ व्हावीत म्हणून पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे प्रभूच्या सहवासात तुम्हांलाही नवचैतन्य लाभेल 20 व तो तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त म्हणजेच येशू ह्याला पाठवील. 21 सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्याद्वारे सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे आवश्यक आहे. 22 मोशेनेही म्हटले आहे, प्रभू तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून पाठवील, तो जे काही तुम्हांला सांगेल, त्याप्रमाणे सर्व गोष्टींत त्याचे ऐका. 23 जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचे लोकांतून समूळ उच्चाटन केले जाईल. 24 तसेच शमुवेलपासून जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी भाकित केले आहे. 25 तुम्ही संदेष्ट्यांची संतती आहात आणि देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या करारातही तुम्ही सहभागी आहात. देवाने अब्राहामला सांगितल्याप्रमाणे ‘तुझ्या संततीमधून पृथ्वीवरील सर्व लोकांना आशीर्वाद प्राप्त होईल’. 26 म्हणूनच देवाने त्याच्या सेवकाला पुनरुत्थित करून प्रथम तुमच्याकडे पाठविले, कारण त्याने तुम्हां प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून परावृत्त होण्यासाठी आशीर्वाद द्यावा.” |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India