Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


पौलाचा रोमपर्यंतचा जलप्रवास

1 आम्ही इटाली देशाला तारवातून जावे असे ठरल्यावर, पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा रोमन अधिकारी ह्याच्या ताब्यात देण्यात आले.

2 आम्ही आशिया प्रांताच्या किनाऱ्यावरील बंदरास जाणाऱ्या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो, तेव्हा मासेदोनियाचा थेस्सलनीकातील रहिवासी अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

3 दुसऱ्या दिवशी आम्ही सीदोन येथे पोहचलो. तेथे यूल्य पौलाबरोबर सौजन्याने वागला. त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.

4 आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्रच्या किनाऱ्यावरून गेलो.

5 किलिकिया व पंफुल्या ह्यांच्यासमोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुर्या बंदरास पोहचलो.

6 तेथे इटालीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू रोमन अधिकाऱ्याला मिळाले, त्यावर त्याने आम्हांला चढवले.

7 पुष्कळ दिवस हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना म्हणून आम्ही क्रेत बेटाच्या किनाऱ्यावरून सलमोनसमोर गेलो.

8 आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर या ठिकाणी आलो. त्याच्याजवळ लसया नगर होते.


तुफानाच्या तडाख्यात

9 फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपवासकाळ येऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे धोक्याचे होते म्हणून पौलाने त्यांना सुचवले,

10 “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवाचेही हाल होऊन मोठी हानी होईल, असे मला दिसते.”

11 सैन्याधिकाऱ्याने पौलाच्या म्हणण्यापेक्षा कप्‍तान व तारवाचा मालक ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले.

12 ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी तेथून निघावे आणि साधेल तर फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. क्रेतमधील ह्या बंदराचे तोंड नैऋत्य व वायव्य दिशांकडे होते.

13 दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस जाईल, असे समजून ते तेथून नांगर उचलून क्रेतच्या बाजूने किनाऱ्याAकिनाऱ्याने गेले.

14 परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा त्या बेटाच्या बाजूने सुटला.

15 त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत जाऊ लागलो.

16 पुढे कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही महत्प्रयासाने होडी सुरक्षित करून घेतली.

17 ती वर घेतल्यावर त्यांनी दोरांनी तारू खालून आवळून बांधले. आपण सुर्ती किनाऱ्याच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले, मग तारू तसेच वाहवत गेले.

18 भन्नाट वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी तारवातील सामान फेकून देऊ लागले

19 आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार फेकून दिले.

20 पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत, तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला, त्यामुळे शेवटी आम्ही वाचण्याची आशा हळूहळू सोडून दिली.

21 त्यांना पुष्कळ दिवस उपवास घडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, खरेच, तुम्ही माझे ऐकावयाला हवे होते. क्रेत बेटावरून निघावयाचे नव्हते म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती.

22 तरी मी तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल;

23 कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,

24 ‘पौल, भिऊ नकोस. तुला कैसरपुढे उभे राहिले पाहिजे आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत, ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’

25 म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरवसा आहे की, त्याने मला जसे कळविले, तसेच घडेल.

26 तथापि आपण एका बेटावर फेकले जाऊ .”

27 नंतर चौदाव्या रात्रीस भूमध्य समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की, आपण कोणत्या तरी किनाऱ्याजवळ येत आहोत.

28 त्यांनी बुडीद टाकले, तेव्हा पाणी चाळीस मीटर खोल आहे, असे आढळले. थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा तीस मीटर खोली आढळली.

29 आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू, असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले.

30 नांगर नाळीवरूनही टाकावे, असे निमित्त सांगून खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळावयास पाहत होते.

31 परंतु पौल रोमन अधिकाऱ्याला व शिपायांना म्हणाला, “हे खलाशी तारवात न राहिले, तर आपले रक्षण व्हावयाचे नाही.”

32 तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापून ती जाऊ दिली.

33 दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांना अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, “आज चौदा दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात. तुम्ही काही खाल्‍ले नाही.

34 मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल, तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही.”

35 असे म्हणून त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला.

36 मग त्या सर्वाना धीर येऊन त्यांनीही अन्न खाल्‍ले.

37 त्या तारवात आम्ही सर्व मिळून दोनशे शाहत्तर जण होतो.

38 जेवून तृप्त झाल्यावर तारू हलके करण्यासाठी त्यांनी सर्व गहू फेकून दिला.

39 दिवस उगवल्यावरही ते स्थळ कोणते, हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा हे त्यांच्या दृष्टीस पडले आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा विचार त्यांनी केला.

40 म्हणून नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले, त्याच वेळेस सुकाणूंची बंधने सैल केली आणि पुढचे शीड वाऱ्यावर सोडून सपाटीची वाट धरली.

41 मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसविले, तेव्हा नाळ रुतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले.

42 बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी मसलत शिपायांनी केली.

43 तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने रोमन अधिकारी त्यांच्या बेतास आडवा आला आणि त्याने हुकूम दिला, “ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनाऱ्यास जावे.

44 बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे.” ह्याप्रमाणे सर्व जण निभावून किनाऱ्यास पोहचले.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan