Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी लावून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवापुढे उचित प्रकारे वागत आलो आहे, हे मी तुम्हांला माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगतो.”

2 उच्च याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना त्याच्या तोंडावर थप्पड मारण्याचा आदेश दिला.

3 पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील, तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याचा आदेश देतोस काय?”

4 तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या उच्च याजकाची निंदा करतोस काय?”

5 पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा उच्च याजक आहे, हे मला ठाऊक नव्हते. तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नकोस, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”

6 त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परुशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये आवेशाने म्हणाला, “बंधुजनहो, मी स्वतः एक परुशी व परुश्यांचा पुत्र आहे, आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”

7 तो हे बोलत आहे तोच परुशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून फूट पडली.

8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात. परुशी तर ह्या गोष्टी मान्य करतात.

9 तेथे मोठी गडबड उडाली. जे शास्त्री परुश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यांतून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही, कदाचित आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर खरोखर बोलला असेल!”

10 असे त्यांच्यांत कडाक्याचे भांडण चालले असता ते पौलाच्या चिंधड्या उडवतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.

11 त्या रात्री प्रभू पौलच्या पुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर, जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”


यहुदी लोकांचा पौलाविरुद्ध कट

12 दिवस उगवल्यावर, काही यहुदी लोक एकजूट करून शपथ घेऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.”

13 हा कट रचणारे इसम चाळीसपेक्षा अधिक होते.

14 ते मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे जाऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडक शपथेने आम्ही स्वतःस बांधून घेतले आहे.

15 तर आता त्याच्याविषयी बारकाईने विचारपूस करावयाची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सरदाराला पटवून द्यावे, म्हणजे पौल जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार असू.”

16 ह्या कारस्थानाविषयी पौलाच्या भाच्याने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.

17 पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा. ह्याला त्यांना काही सांगावयाचे आहे.”

18 त्याने त्याला सहस्त्राधिपतीकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.”

19 सहस्त्राधिपतीने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”

20 तो म्हणाला, “यहुदी अधिकाऱ्यांनी असे संगनमत केले आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्याला उद्या सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.

21 तर आपण त्यांचे ऐकू नका कारण त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला ठार मारीपर्यंत ते खाणार पिणार नाहीत. आता ते तयार होऊन आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.”

22 “तू हे मला कळविले आहे, हे कोणाला सांगू नकोस”, असे त्या तरुणाला बजावून सहस्त्राधिपतीने त्याला निरोप दिला.


पौलाला कैसरिया येथे पाठवितात

23 सहस्त्राधिपतीने त्याच्या दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरिया येथे जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी आज रात्री नऊ वाजता तयार ठेवा.

24 घोडे मिळवा. त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सुरक्षित न्या.”

25 नंतर त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले -

26 महाराज फेलिक्स राज्यपाल ह्यांस, क्लौद्य लुसिया ह्याचा नमस्कार,

27 ह्या मनुष्याला यहुदी लोकांनी धरले होते आणि ते त्याचा घात करणार होते, इतक्यात हा रोमन आहे, असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन त्याला सोडवले.

28 ह्याच्यावर आरोप ठेवण्याचे काय कारण होते, हे समजून घेण्याच्या इच्छेने मी त्याला त्यांच्या न्यायसभेत नेले.

29 त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टीसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा तुरुंगवासाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला आढळले.

30 ह्या माणसाविरुद्ध कट रचण्यात आला आहे, अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगितले आहे.

31 शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्रीच्या वेळी अंतिपत्रीस येथे नेले.

32 दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार तयार ठेवून ते गढीत परत आले.

33 कैसरियास गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलला त्याच्यापुढे उभे केले.

34 पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे, असे समजल्यावर

35 त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” नंतर त्याला हेरोदच्या वाड्यात देखरेखीखाली ठेवावे, असा त्याने हुकूम सोडला.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan