Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


यहुदीतरांतले ख्रिस्ती व मोशेचे नियमशास्त्र

1 काही जणांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांस अशी शिकवण दिली, “मोशेने नेमून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.”

2 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी तीव्र मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेममधले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.

3 मग ख्रिस्तमंडळीने त्यांना निरोप दिल्यावर ते फेनिके व शोमरोन यांमधून गेले आणि यहुदीतर लोक देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.

4 नंतर ते यरुशलेमला पोहचल्यावर तेथील ख्रिस्तमंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्यांनी जे जे केले, ते त्यांनी सांगितले.

5 तरी पण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले की, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.


यरुशलेम येथील धर्मसभा

6 प्रेषित व वडीलवर्ग ह्या गोष्टींविषयी विचार करावयास जमले.

7 पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून शुभवर्तमान ऐकून यहुदीतरांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून देवाने तुमच्यामधून माझी निवड केली.

8 हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांस तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे.

9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.

10 असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?

11 तर मग जसे त्यांचे तसे आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने झाले आहे, असा आपला विश्वास आहे.”

12 सर्व लोक गप्प राहिले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्याद्वारे देवाने यहुदीतरांमध्ये जे चमत्कार व अद्भूत गोष्टी केल्या त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.

13 त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, “बंधुजनहो, माझे ऐका.

14-15 यहुदीतरांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनने सांगितले आहे आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो असा धर्मशास्त्रलेख आहे:

16 ह्यानंतर मी परत येईन, व दावीदचे राज्य पुन्हा उभारीन; त्याची पडझड दुरुस्त करून त्याची पुनर्बांधणी करीन;

17 म्हणजे उर्वरित माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा;

18 हे जे त्याने युगादियुगाच्या सुरवातीपासून विदित केले आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.

19 म्हणून माझे तर मत असे आहे की, जे यहुदीतरांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये.

20 उलट त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा;

21 कारण प्राचीन काळापासून दर साबाथ दिवशी प्रार्थनास्थळी मोशेचे शब्द वाचून दाखवून त्यांची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”


यहुदीतरांतील ख्रिस्ती लोकांना पत्र

22 पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील अत्यंत आदरणीय समजल्या जाणाऱ्या बर्शब्बा म्हटलेल्या यहुदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल, असे सर्व ख्रिस्तमंडळीसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले.

23 त्यांच्या हाती त्यांनी असे पत्र लिहून पाठवले: अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील यहुदीतरांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा नमस्कार.

24 आमच्यापैकी काहींनी जाऊन त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनात संदेह निर्माण करून तुम्हांला त्रास दिला, असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.

25 म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की,

26 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुमच्याकडे पाठवावीत.

27 ह्याकरता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठविले आहे. ते स्वतः आम्ही इथे लिहिलेल्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील;

28 कारण पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये, असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले:

29 त्या गोष्टी म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म हे तुम्ही वर्ज्य करावे, ह्यांपासून स्वतःला दूर ठेवाल तर तुमचे हित होईल. तुमचे कल्याण असो.

30 त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व श्रद्धावंतांना जमवून ते पत्र सादर केले.

31 त्यातला प्रोत्साहनात्मक संदेश वाचून त्यांना आनंद झाला.

32 यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते म्हणून त्यांनी बराच वेळ बोलून बंधुजनांस धैर्य व शक्ती देणारा बोध केला.

33 ते काही दिवस तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते, त्यांच्याकडे बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले.

34 परंतु सीलाला तेथे आणखी राहावयास बरे वाटले.

35 पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व शुभवर्तमानाची घोषणा करीत अंत्युखियात राहिले.


पौल व बर्णबा वेगळे होतात

36 काही दिवसानंतर पौलने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली, त्या त्या नगरांत पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत, ते पाहू या.”

37 बर्णबाची इच्छा होती की, योहान ऊर्फ मार्कलाही बरोबर घ्यावे.

38 परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही.

39 ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा योहान ऊर्फ मार्कला घेऊन तारवात बसून कुप्र येथे गेला.

40 पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या हाती सोपविल्यावर तो तेथून निघाला.

41 तो ख्रिस्तमंडळ्यांना स्थिर करीत सूरिया आणि किलिकिया या प्रदेशातून गेला.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan