Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


अंत्युखिया येथील ख्रिस्तमंडळी

1 अंत्युखिया येथील ख्रिस्तमंडळीत बर्णबा, निग्र म्हटलेला शिमोन, लूक्य कुरेनेकर, हेरोद राज्यपालाच्या सहवासात वाढलेला मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.

2 ते प्रभूची सेवा व उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.”

3 त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली व त्यांची रवानगी केली.


कुप्र येथे बर्णबा व शौल

4 ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्र येथे गेले.

5 ते सलमीना या ठिकाणी आल्यावर त्यांनी देवाच्या वचनाची यहुदी लोकांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली. योहान ऊर्फ मार्क हा त्यांचा सेवक त्यांच्याबरोबर होता.

6 पुढे ते सबंध बेट चालून पफे या ठिकाणी गेल्यावर बर्येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला.

7 तो तेथील राज्यपाल सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान माणसाचा मित्र होता. ह्या राज्यपालाने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली,

8 परंतु अलीम (त्या नावाचा अर्थ जादूगार असा आहे) ह्याने त्यांना अडवून राज्यपालाला विश्वासापासून फितविण्याचा प्रयत्न केला.

9 शौल, ज्याला पौल देखील म्हणत, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला,

10 “अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या चांगुलपणाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?

11 आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील, व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आपणाला कोणीतरी हाताला धरून न्यावे म्हणून तो आजूबाजूला माणसाचा शोध घेऊ लागला.

12 जे झाले ते पाहून त्या राज्यपालाने प्रभूच्या संदेशाविषयी आश्चर्य व्यक्त करून विश्वास ठेवला.


पौलाने यहुदी लोकांना केलेला उपदेश

13 पौल व त्याचे सहकारी पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले. योहान ऊर्फ मार्क त्यांना सोडून यरुशलेम येथे परत गेला.

14 ते पिर्गा येथून निघून पिसिदियांतील अंत्युखियास पोहचले. साबाथ दिवशी ते सभास्थानात जाऊन बसले.

15 नियमशास्त्राचे व संदेष्ट्याच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संदेश पाठवला, “बंधुजनहो, तमुच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”

16 पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, “अहो इस्राएली लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका.

17 इस्राएली लोकांच्या ह्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी हाताने त्यांना तेथून काढले.

18 पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता, त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले.

19 त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडे चारशे वर्षेपर्यंत वतन म्हणून दिली.

20 त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले.

21 मग त्यांनी राजा मागितला, तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना राजा म्हणून दिला.

22 नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’

23 ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने स्वतः दिलेल्या वचनानुसार इस्राएलला तारण्यासाठी येशू आला आहे.

24 त्याच्या प्रकट होण्यापूर्वी, योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा सर्व इस्रायली लोकांमध्ये केली होती.

25 योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा काढावयासही मी पात्र नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे.’

26 अहो बंधुजनहो, अब्राहामच्या वंशांतील पुत्रांनो व देवाचे भय बाळगणाऱ्या यहुदीतरांनो, आपल्याला ह्या तारणाचे वर्तमान पाठवलेले आहे!

27 कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी येशूला न ओळखता आणि दर साबाथ दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्यांनी संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण केले

28 आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा, अशी विनंती त्यांनी पिलातला केली.

29 त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले.

30 पण देवाने त्याला मरणातून उठवले.

31 त्याच्याबरोबर जे गालीलहून यरुशलेम येथे आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता इस्राएली लोकांसाठी त्याचे साक्षीदार आहेत.

32 आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते, त्याचे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो.

33 देवाने येशूला पुन्हा उठवून त्याचे वचन आपल्याकरता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रात असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.

34 शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे, दावीदला जे वचन दिले होते त्यानुसार मी तुम्हांला पवित्र व निश्चित असा आशीर्वाद देईन.

35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र सेवकाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.

36 कारण दावीद त्याच्या स्वतःच्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून निधन पावला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याचा मृतदेह कुजला.

37 परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही.

38 म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असावे की, ह्याच्याद्वारे तुमच्या पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे.

39 ज्याविषयी मोशेच्या नियमशास्रानुसार तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.

40 म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुमच्यावर ओढवेल,

41 अहो उपहास करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी स्पष्टीकरण देऊन सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही.

42 पौल व बर्णबा बाहेर जात असता लोकांनी विनंती केली, “आम्हांला पुढल्या साबाथ दिवशी ह्याविषयी अधिक ऐकायला आवडेल.”

43 सभा संपल्यावर यहुदी लोकांमधील व परिवर्तित यहुदी मतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्याकरिता त्यांना प्रोत्साहन दिले.


प्रेषित यहुदीतरांकडे वळतात

44 पुढच्या साबाथ दिवशी जवळ जवळ सर्व नगर, देवाचे वचन ऐकावयाला जमले.

45 पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.

46 परंतु पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगणे अगत्याचे होते, तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांस शाश्वत जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्याअर्थी आम्ही यहुदीतरांकडे वळतो;

47 कारण प्रभूने आम्हांला अशी आज्ञा दिली आहे, मी तुला यहुदीतरांसाठी प्रकाश असे करून ठेवले आहे. ह्यासाठी की, सर्व जगाचे तारण व्हावे.”

48 हे ऐकून यहुदीतर आनंदित झाले, त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला आणि जितके शाश्वत जीवनासाठी निवडलेले होते, तितक्यांनी विश्वास ठेवला.

49 प्रभूचे वचन त्या सर्व प्रदेशात पसरत गेले.

50 यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले.

51 प्रेषित त्यांचा विरोध दर्शवीत पायांची धूळ झटकून तेथून इकुन्य येथे गेले.

52 अंत्युखियामधील श्रद्धावंत आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan