Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रेषित 11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


पेत्राचे आत्मसमर्थन

1 प्रेषितांनी व यहुदिया प्रांतांत असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, यहुदीतरांनीही देवाचे वचन स्वीकारले आहे.

2 पेत्र यरुशलेम येथे गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की,

3 “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही भोजन घेतले.”

4 पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली:

5 “मी यापो नगरात प्रार्थना करत होतो, तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले व ते मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून आकाशांतून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले.

6 त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करत होतो तो पृथ्वीवरचे चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातले पक्षी माझ्या दृष्टीस पडले.

7 मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्र, ऊठ, मारून खा.’

8 परंतु मी म्हणालो, ‘नको नको, प्रभो, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही.’

9 दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’

10 असे तीनदा झाले, नंतर सर्व काही पुन्हा आकाशात वर ओढले गेले.

11 इतक्यात ज्या घरात आम्ही होतो त्या घरापुढे कैसरियामधून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.

12 तेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितले, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ ते सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही कर्नेल्यच्या घरी गेलो.

13 त्याने आम्हांला सांगितले, “मी माझ्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, ‘यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून आण.

14 ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल, अशा गोष्टी तो तुला सांगेल’.

15 मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर उतरला तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला.

16 तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की, ‘योहान पाण्याने बाप्तिस्मा देत असे हे खरे, परंतु तुम्हांला बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने दिला जाईल.’

17 जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा जसे आपणांस तसेच त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडविणारा असा मी कोण?”

18 हे ऐकून त्यांनी टीका करणे बंद केले आणि देवाचा गौरव करीत ते म्हणाले, “तर मग देवाने यहुदीतरांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”


श्रद्धावंतांना ख्रिस्ती हे नांव

19 स्तेफनवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण फेनीके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून फक्त यहुदी लोकांना देवाचे वचन सांगत होते.

20 परंतु कुप्र व कुरेनेकर येथील कित्येकांनी अंत्युखियात जाऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान ग्रीक लोकांनाही सांगितले.

21 त्या वेळी प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याबरोबर होते आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळत होते.

22 त्यांच्याविषयीचे वृत्त यरुशलेममधील ख्रिस्तमंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.

23 तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला. त्याने त्या सर्वांना बोध केला, “दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.”

24 बर्णबा चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा पुष्कळ जण प्रभूला मिळाले.

25 नतंर तो शौलाचा शोध करावयाला तार्स येथे गेला.

26 त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियाला आणले. त्याने तेथे वर्षभर ख्रिस्तमंडळीमध्ये मिसळून बऱ्याच लोकांना प्रबोधन केले. श्रद्धावंतांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.


बर्णबा व शौल यरुशलेममध्ये येतात

27 त्या दिवसांत यरुशलेमहून अंत्युखियास काही संदेष्टे आले.

28 त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुचविले, “सर्व जगात भीषण दुष्काळ पडणार आहे.” (हा दुष्काळ क्लौद्य सम्राटाच्या राजवटीत झाला.)

29 हे ऐकून प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ति साहाय्य पाठवावे.

30 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे त्यांचे दान त्यांनी बर्णबा व शौल ह्यांच्याद्वारे ख्रिस्तमंडळीच्या वडिलांकडे पाठवून दिले.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan