Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

2 तीमथ्य 2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक

1 माझ्या मुला, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या कृपेत बलवान होत जा.

2 पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील.

3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो.

4 जो युद्धात मग्न असतो तो स्वत: संसाराच्या कार्यात गुंतत नाही, ह्यासाठी की, सैन्याधिकाऱ्याला त्याला संतुष्ट करावयाचे असते.

5 धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही.

6 श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने प्रथम पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.

7 जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो.

8 माझ्या शुभवर्तमानानुसार दावीदच्या संतानांतील मृतांतून उठविलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण ठेव.

9 ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही.

10 निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो.

11 हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू.

12 जर आपण धीराने सहन करतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील.

13 आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.


देवाला आवडणारा सेवक

14 तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.

15 सत्याचे वचन दक्षतेने सांगणारा व स्वतःच्या सेवाकार्याची लाज न बाळगणारा असा देवाच्या पसंतीला उतरलेला कामगार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कर.

16 अमंगल व मूर्ख स्वरूपाच्या वादविवादापासून दूर राहा कारण असा वितंडवाद लोकांच्या अधार्मिकपणात भर घालतो.

17 अशी शिकवणूक कॅन्सरसारखी पसरते. हुमनाय व फिलेत ह्या दोघांनी अशी शिकवणूक दिलेली आहे.

18 ते सत्यापासून बहकले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे, असे म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात.

19 तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे: ‘आपले जे आहेत त्यांना प्रभू ओळखतो’ आणि ‘जो कोणी मी प्रभूचा आहे, असे म्हणतो त्याने अनीतीपासून दूर राहावे’.

20 मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यांपैकी कित्येकांचा उपयोग विशेष प्रसंगी केला जातो व काहींचा सामान्य कार्यासाठी केला जातो.

21 जर कोणी दुष्टपणापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो सन्मानासाठी पवित्र केलेले, प्रभूला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामाकरिता तयार केलेले असे पात्र होईल.

22 तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध अंत:करणाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर यथोचित संबंध, विश्वास, प्रीती व शांती ह्यांचा पाठपुरावा कर.

23 मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे.

24 प्रभूच्या सेवकाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील,

25 विरोध करणाऱ्यांना नम्रतेने शिक्षण देणारा, असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी पश्चात्तापबुद्धी देईल

26 आणि त्यानंतर सैतानाच्या पाशातून सुटून ते देवाच्या इच्छेस वश होण्याकरता भानावर येतील.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan