Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

2 थेस्सल 2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


प्रभू येशूच्या पुनरागमनासंबंधी चुकीच्या कल्पना

1 बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याचे व आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही आवाहन करतो की,

2 तुम्ही एकदम मनात गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, अशा विचाराने चिंताग्रस्त होऊ नका. कदाचित आमच्याकडून आलेल्या भविष्यवाणीतून, प्रबोधनातून किंवा पत्रातून आम्हीच असे म्हटले, असा विचार केला जात असावा.

3 कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर अंतिम बंड पुकारले जाऊन तो अनाचारी प्रकट होईल.

4 तो नाशाचा पुत्र, विरोधक असून तथाकथित प्रत्येक दैवत किंवा पूज्य म्हणून म्हणतात त्या वस्तूपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून म्हणजे ‘मी देव आहे’, असे स्वतःचे प्रदर्शन करीत तो देवाच्या मंदिरात जाऊन बसेल.

5 मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगितले होते, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?

6 तरीही आता ह्या गोष्टीच्या आड काहीतरी येत आहे व ती गोष्ट कोणती, हे तुम्हांला ठाऊक आहे. म्हणजेच तो नेमलेल्या समयी प्रकट होईल.

7 तो रहस्यमय अनाचार आत्ताच आपले कार्य करीत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे, तो मार्गामधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील.

8 मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्‍वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील.

9 त्या अनाचाऱ्याचे आगमन सैतानी कार्यात दिसून येते. तो सर्व सामर्थ्य, चिन्हे, खोटे चमत्कार

10 व ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुष्ट फसवेगिरीचा प्रयोग करील कारण त्यांनी तारणासाठी ज्या सत्याचे स्वागत करून आवड धरायला हवी होती, ते केले नाही.

11 ह्यामुळे त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांच्यामध्ये भ्रांतीचे कार्य चालू राहील, असे देव करील.

12 ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांना दोषी ठरवण्यात यावे, म्हणून असे होईल.


आभारप्रदर्शन व प्रार्थना

13 बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाचे नेहमी आभार मानावयास हवेत; कारण आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.

14 देवाने तुम्हांला आमच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.

15 तर मग बंधूंनो, तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे सत्य आम्ही तुम्हांला शिकविले त्यात स्थिर राहा व ते घट्ट धरून ठेवा.

16 आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वत: आणि ज्याने कृपेद्वारे आपल्यावर प्रीती करून आपल्याला शाश्‍वत प्रोत्साहन व चांगली आशा दिली तो देव आपला पिता,

17 प्रत्येक चांगल्या कृतीसाठी व उक्तीसाठी तुमची अंत:करणे प्रोत्साहित व बळकट करो.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan