2 थेस्सल 1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)शुभेच्छा व आभार 1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यामध्ये असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या ख्रिस्तमंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून: 2 देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो. 3 बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाचे आभार मानावयास हवेत आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुमच्या सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती वाढत आहे. 4 ह्यावरून तुम्ही सोसत असलेल्या तुमच्या सर्व छळांत व संकटांत तुम्ही जी चिकाटी व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या ख्रिस्तमंडळ्यांत आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. 5 हा सर्व देवाच्या यथार्थ न्यायाचा पुरावा आहे. तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्या देवाच्या राज्यासाठी तुम्ही पात्र ठरावे. 6 तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर संकटातून मुक्त करणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. 7 प्रभू येशू प्रकट होईल, तेव्हा तो हे सिद्धीस नेईल. येशू त्याच्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल. 8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूचे शुभवर्तमान मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवील. 9 त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या गौरवशाली सामर्थ्यापासून दूर करण्यात येऊन शाश्वत विनाश ही शिक्षा मिळेल. 10 त्या दिवशी आपल्या पवित्र लोकांकडून गौरव मिळविण्यासाठी आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी अचंबित व्हावे म्हणून तो येईल. तुम्हीही त्यात सहभागी व्हाल कारण आम्ही दिलेल्या संदेशावर तुम्ही विश्वास ठेवला आहे. 11 ह्याकरिता आम्ही तुमच्यासाठी सर्वदा प्रार्थना करतो, म्हणजे जे जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हांला आमंत्रित केले आहे, त्यासाठी तो तुम्हांला पात्र करो व तुमचा प्रत्येक चांगला मनोदय व तुमचे श्रद्धेने केलेले कार्य त्याच्या सामर्थ्याने तो पूर्णत्वास नेवो. 12 अशा प्रकारे आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपल्या प्रभू येशूच्या नावाला तुमच्यामध्ये व तुम्हांला त्याच्यामध्ये गौरव मिळेल. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India