2 पेत्र 3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस 1 प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहिले आहे. ह्या दोन्ही पत्रांमध्ये मी तुम्हांला ह्या गोष्टींची आठवण देऊन तुमच्या मनामध्ये निर्मळ विचार जागृत करीत आहे. 2 ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू आणि तारणारा ह्याने प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. 3 सर्वप्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे व उपहास करणारे लोक शेवटच्या दिवसात चेष्टा करीत म्हणतील, 4 “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निधन पावले, तरी सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे!” 5 ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश व पृथ्वी ही निर्माण झाली. पृथ्वी पाण्यातून व पाण्याच्या योगे घडविली गेली. 6 तेव्हाच्या जगाचा पुराच्या पाण्याने नाश झाला. 7 पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच देवाच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत ती राखून ठेवलेली आहेत. 8 परंतु प्रियजनहो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका! प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. 9 कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा आहे. 10 मात्र चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश कर्कश नाद करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी उघडकीस येतील. तयारी ठेवण्याची आवश्यकता 11 ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे. 12 त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि मूलतत्त्वे तप्त होऊन वितळतील. 13 परंतु ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची देवाच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. 14 म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्याच्याबरोबर शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. 15 आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे. 16 त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात, तसा ह्याचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. 17 परंतु प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा. 18 आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India