Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

2 पेत्र 2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


खोटे संदेष्टे व पापी जीवनक्रम

1 पूर्वीच्या काळी खोटे संदेष्टे होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक निर्माण होतील, ते विध्वंसक, असत्य मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले, त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील.

2 तसेच त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील, आणि त्यांच्या वर्तनामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.

3 ते लोभ धरून बनावट गोष्टी तुम्हांला सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासून विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही!

4 ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारात जखडून ठेवले आहे.

5 त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेशहर नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले.

6 पुढे येणाऱ्या अभक्तांस उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली

7 आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली.

8 तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता, तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता.

9 भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.

10 विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या मागे लागणारे व देवाचा अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हे खोटे धर्मशिक्षक उद्धट, स्वच्छंदी आणि थोरांची निंदानालस्ती करण्यास न भिणारे असे आहेत.

11 सामर्थ्याने व अधिकाराने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांस दोषी ठरवीत नाहीत.

12 पण हे लोक स्वतःला न समजणाऱ्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. उपजत प्रवृत्तीनुसार वागल्यामुळे पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत, त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेतच नाश होईल.

13 अनीतीचे वेतन म्हणजे क्लेश, त्यांच्या पदरी पडतील. दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते.

14 शीलभ्रष्ट स्त्रियांशिवाय त्यांना दुसरे काही पाहायला आवडत नाही. पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांची हृदये लोभात निर्ढावलेली असतात; ते शापग्रस्त लोक आहेत!

15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत.

16 त्याच्या उ्रंघनाबद्दल त्याचा निषेध करण्यात आला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला.

17 हे लोक कोरड्या झऱ्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड अंधार राखलेला आहे.

18 भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.

19 हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः मात्र भ्रष्टतेचे दास असतात कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो, त्याचा तो दासही बनतो.

20 प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जे पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले. त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झालेली असते.

21 नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते.

22 ‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व ‘अंग धुतल्यानंतर चिखलात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशा ज्या म्हणी आहेत त्यांच्यासारखी त्यांची गत झालेली असते.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan