Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ करिंथ 5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 आम्हांला ठाऊक आहे की, जरी आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी घर म्हणजेच आमचे शरीर मोडून टाकण्यात आले, तरी देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले घर नसून शाश्वत घर आहे.

2 ह्या घरात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूपी वस्त्र परिधान करण्यासाठी आतूर होतो.

3 आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो तर, आम्ही शरीराविना सापडणार नाही.

4 जे आम्ही ह्या मंडपात आहोत, ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो. आमच्या ऐहिक शरीराचा त्याग करावा अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर स्वर्गीय वस्त्र परिधान करावे अशी इच्छा आम्ही बाळगतो, ह्यासाठी की, जे मर्त्य आहे, ते जीवनाच्यायोगे संजीवित व्हावे.

5 देवाने आम्हांला ह्याकरिताच सिद्ध केले आहे आणि त्याने त्याचा आत्मा हमी म्हणून दिला आहे.

6 ह्यामुळे आम्ही सर्वदा धैर्य धरतो, आणि हे लक्षात ठेवतो की, आम्ही शरीरात वसती करीत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत;

7 कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.

8 आम्ही धैर्य धरतो आणि शरीराचा त्याग करून प्रभूबरोबर राहणे आम्ही पसंत करू..

9 आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे.

10 कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपात प्रकट व्हावे लागते. प्रत्येकाने देहाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांचे फळ त्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर मिळावे.


ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर मैत्री

11 म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. परमेश्वर आम्हांला पूर्णपणे ओळखतो आणि तुमच्या अंतःकरणात तुम्ही मला चांगल्या प्रकारे जाणता, अशी आशा मी धरतो.

12 आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हांला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची पुन्हा संधी मिळावी म्हणून असे लिहितो ज्यामुळे जे चारित्र्याबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टीबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हांला उत्तर देता यावे.

13 आम्ही भ्रमिष्ट झालो असलो, तर ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो, तर ते तुमच्यासाठी.

14 ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. एक सर्वांसाठी मरण पावला याचा अर्थ असा की, सर्व त्याच्या मरणात सहभागी झाले आहेत.

15 तो सर्वांसाठी ह्याकरता मरण पावला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मरण पावला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे.


ख्रिस्तामध्ये नवजीवन

16 तर मग आत्तापासून आम्ही कोणाचा मानवी मापदंडाने न्याय करीत नाही. जरी आम्ही ख्रिस्ताला एकेकाळी मानवी दृष्टीकोणातून ओळखले होते, तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.

17 जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल, तर तो नवी निर्मिती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, सर्व काही नवीन झाले आहे.

18 हे देवाचे कार्य आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेट घडवून आणण्याचे सेवाकार्य आमच्यावर सोपविले.

19 म्हणजे जगातील लोकांची पापे त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेट घडवून आणण्याचा संदेश सोपवून दिला आहे.


समेटाचा संदेश

20 ज्याअर्थी परमेश्वर आमच्याद्वारे आवाहन करीत आहे, त्याअर्थी आम्ही राजदूत आहोत म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही परमेश्वराबरोबर समेट केलेले व्हा.

21 ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले कारण त्याच्यामुळे आपले देवाबरोबरचे संबंध यथोचित व्हावेत.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan