Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ करिंथ 12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक दुर्बलता

1 प्रौढी मिरवणे मला भाग पडते. तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मला झालेले प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण ह्यांच्याकडे मी आता वळतो.

2 एक ख्रिस्तामधील मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे सर्वोच्च स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. (हे प्रत्यक्ष घडले किंवा त्याला तसा दृष्टान्त झाला, हे मला ठाऊक नाही. केवळ देवाला ठाऊक आहे,)

3-4 त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले (हे प्रत्यक्ष घडले किंवा त्याला तसा दृष्टान्त झाला, हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे.) आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.

5 अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.

6 जरी मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली, तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन. तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये.

7 प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी फुगून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे सैतानाचा एक हस्तक माझ्यावर प्रहार करण्याकरिता ठेवण्यात आला होता.

8 हा माझ्यापासून काढला जावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली.

9 परंतु त्याने मला म्हटले, ‘माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस पोहचते.’ म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.

10 ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ, आपत्ती ह्यांत मला समाधान आहे; कारण जेव्हा मी अशक्त असतो, तेव्हाच मी सशक्त असतो.


आढ्यतेने लिहिण्याचे कारण

11 मी मूढ बनलो. असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करावयाची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या परमश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही हलक्या दर्जाचा नाही.

12 खऱ्या प्रेषिताची चिन्हे, अद्भूत कृत्ये व महत्कृत्ये तुमच्यामध्ये अत्यंतिक धीराने करून दाखविण्यात आली.

13 मी आपला आर्थिक भार तुमच्यावर लादला नाही, ही बाब सोडली तर इतर ख्रिस्तमंडळ्यांपेक्षा तुमची दुरावस्था झाली काय? माझ्या ह्या दुष्कृत्याबद्दल मला क्षमा करा!

14 पाहा, तिसऱ्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे. मी तुमच्यावर भार टाकणार नाही, मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.

15 मी तुमच्या जिवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर फारच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?

16 तर मग तुम्ही हे मान्य कराल की, मी तुमच्यावर भार घातला नाही, परंतु एखादा म्हणेल मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला खोटारडेपणाने पकडले.

17 कसे? ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाद्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय?

18 मी तीताला तुमच्याकडे येण्याची विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बांधवाला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला, असे तुम्ही म्हणाल काय? आम्ही दोघे सारख्याच हेतूंनी कार्य करीत नव्हतो काय? सारख्याच पद्धतीने वागत नव्हतो काय?

19 कदाचित आम्ही स्वतःचे समर्थन करीत आहोत, असे इतका वेळ तुम्हांला वाटले असेल. नाही! आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताला अनुसरून बोलत आहोत. प्रियजनहो, हे सर्व तुमच्या उभारणीसाठी आहे.

20 मला भीती वाटते की, मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे, तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही आणि तुमची अपेक्षा नाही, तसा मी तुम्हांला दिसून येईन. कदाचित भांडणतंटे, मत्सर, राग, स्वार्थी वृत्ती, निंदानालस्ती, गप्पाटप्पा, घमेंड व गैरवागणूक हे सारे मला आढळून येईल.

21 मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहावयास लावील आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण केलेल्या अनैतिक गोष्टींचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला अश्रू ढाळावे लागतील.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan