Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ करिंथ 11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


प्रेषित म्हणून पौलाचा हक्व

1 माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, खरे म्हणजे ते तुम्ही करीतच आहात.

2 तुमच्याविषयीची माझी ईर्ष्या देवाच्या ईर्ष्येसारखी आहे. मी फक्त एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारिका म्हणून ख्रिस्ताला सादर करावे.

3 सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;

4 कारण तुम्ही आनंदाने असा माणूस खपवून घेता जो, आम्ही ज्याची घोषणा केली नाही, अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आत्म्यापेक्षा निराळा आत्मा तुम्ही स्वीकारता अथवा तुम्ही स्वीकारलेल्या शुभवर्तमानापेक्षा निराळे शुभवर्तमान स्वीकारता व सहजपणे तुम्ही त्याच्या आहारी जाता.

5 परमश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही, असे मी मानतो.

6 कदाचित मी भाषण करण्यात प्रवीण नसलो, तरी ज्ञानात कमी नाही, हे आम्ही तुम्हांला सर्वदा प्रत्येक परिस्थितीत दाखवून दिले आहे.

7 तुम्ही महान व्हावे म्हणून मी स्वतःला लीन करून देवाचे वचन विनामूल्य तुम्हाला सांगितले, हे मी पाप केले काय?

8 मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या ख्रिस्तमंडळ्यांपासून वेतन घेऊन त्यांना जणू काही लुटले

9 आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले, तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी स्वतःला सांभाळले व सांभाळेन!

10 माझ्यातील ख्रिस्ताच्या सत्याला स्मरून मी सांगतो की, माझा हा अभिमान संपूर्ण अखया प्रांतात कुठेही नाकारला जाणार नाही.

11 मी तुमच्यावर प्रीती करीत आहे म्हणून मी हे बोलत आहे. देवाला ठाऊक आहे की, मी तुमच्यावर प्रीती करतो.

12 जे मी आत्ता करतो, ते मी करत राहीन, ज्यामुळे त्या दुसऱ्या प्रेषितांना आम्ही त्यांच्यासारखेच सेवाकार्य करतो अशी बढाई मारण्याची व असे बोलण्याची सबब मिळू नये.

13 हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत.

14 ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो!

15 म्हणून त्याच्या हस्तकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले, तर ती फार मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कृत्यांना साजेसा होईल.


पौल व त्याचे विरोधक ह्यांची तुलना

16 मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल, तर निदान जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन.

17 अर्थात मी जे बोलतो, ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो.

18 देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.

19 तुम्ही सुज्ञ आहात म्हणून आनंदाने मूढाचे सहन करता!

20 कोणी तुमच्यावर सत्ता चालविली किंवा तुमचा गैरफायदा घेतला किंवा कोणी तुमच्याविरुद्ध डावपेच रचले किंवा तुम्हांला हीन लेखले किंवा कोणी तुमच्या थोबाडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


पौलाने सोसलेली संकटे

21 ही गोष्ट मान्य करायला मला शरम वाटते की, अशा गोष्टी करायला आम्ही फारच भित्रे होतो!

22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे.

23 ते अब्राहामचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे! (हे मी वेडगळासारखे बोलतो). मी अधिक कठोर परिश्रम केले आहेत. मी अधिक वेळा तुरुंगवास भोगला आहे. मी अगणित फटके खाल्ले आहेत. मी पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत सापडलो होतो - या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.

24 पाच वेळा मी यहुदी लोकांच्या हातून चाबकाचे एकोणचाळीस फटके खाल्ले.

25 तीन वेळा रोमन लोकांकडून छड्यांचा मार खाल्ला. एकदा माझ्यावर दगडफेक झाली. तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली.

26 मी किती तरी प्रवास केला. पुरांमुळे आलेली संकटे, लुटांरूमुळे आलेली संकटे, माझ्या यहुदी देशबांधवांनी आणलेली संकटे, यहुदीतरांनी आणलेली संकटे;

27 श्रम व कष्ट, किती तरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, अन्नवस्र व निवारा याविना काढलेले दिवस ह्या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.

28 शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांविषयी चिंता, ही आहे.

29 एखादा दुर्बळ असला, तर मलाही दुर्बलता जाणवते आणि जर एखाद्याला पाप करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले, तर मला क्लेश होत नाहीत काय?

30 जर मला प्रौढी मिरवणे भाग पडले तर मी माझ्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.

31 प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुगे कृपावंत आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.

32 मी दिमिष्क येथे होतो, तेव्हा अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरता त्या नगरावर रक्षक नेमले होते.

33 परंतु मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan