Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

1 पेत्र 1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


शुभेच्छा

1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्या प्रांतांत हद्दपार केलेल्या, देवाच्या निवडलेल्या लोकांना:

2 देवपित्याच्या योजनेनुसार तुम्ही निवडलेले आहात. तुम्हांला पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करून त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


आभारप्रदर्शन

3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपल्याला नवजीवन दिले. हे आपले अंतःकरण जिवंत आशेने भरून टाकते.

4 म्हणूनच आपण स्वर्गातील अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्याची प्रतीक्षा करतो.

5 तुम्हांला तारणासाठी श्रद्धेद्वारे देवाच्या सामर्थ्याने सुरक्षित राखण्यात आले आहे. हे तारण शेवटच्या काळी प्रकट होणार आहे.

6 जरी तुम्हांला आत्ता काही काळ निरनिराळ्या कठीण प्रसंगांमुळे दुःख सहन करणे भाग पडत असले, तरी ह्याविषयी तुम्ही उ्रास करा.

7 ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची पारख अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे त्याचे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांत पर्यवसान व्हावे.

8-9 त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवाचे तारण, ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उ्रास करता.

10 ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला.

11 त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी यांविषयी भाकीत केले तेव्हा त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला ह्याविषयी ते शोध करीत होते.

12 त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हांला शुभवर्तमान सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हांला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे, तर तुमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी पाहण्याची उत्कंठा देवदूतांनादेखील आहे.


ख्रिस्तशिष्यांना शोभेल असे शील

13 म्हणून तुम्ही तुमचे मन कृतीसाठी खंबीर करा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.

14 तुम्ही आज्ञाधारक मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका.

15 उलट, तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचारणात पवित्र व्हा.

16 असा धर्मशास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’

17 जो तोंडदेखला न्याय करीत नाही, तर ज्याच्यात्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात त्याचा आदर राखा.

18 कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे,

19 तर निष्कलंक व निर्दोष कोकरू जो ख्रिस्त ह्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात.

20 ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.

21 तुम्ही त्याच्याद्वारे विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.

22 प्रांजल बंधुप्रेमासाठी तुम्ही स्वतःला सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.

23 कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सजीव व टिकणाऱ्या शब्दाद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात.

24 पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, सर्व मानवजात गवतासारखी आहे आणि तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते.

25 परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते. शुभवर्तमानाचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले, ते हेच होय.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan