Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

1 योहान 1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


ख्रिस्ताद्वारे शाश्वत जीवन

1 जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, होय, जे आम्ही पाहिले आहे व ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला आहे त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही लिहीत आहोत.

2 हे जीवन दृश्यमान झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. हे शाश्वत जीवन पित्याजवळ होते व ते आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला जाहीर करतो.

3 जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हांला ह्यासाठी कळवितो की, तुम्हीही आमच्यात सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे.

4 आपला आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही लिहितो.


देवाचा सहवास म्हणजे पापाचा त्याग

5 जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आहे, तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही.

6 त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणतो व अंधारात चालतो, तर आपण खोटे बोलतो; सत्याने वागत नाही.

7 पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते.

8 आपल्यामध्ये पाप नाही, असे जर आपण म्हणतो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्यामध्ये सत्य नाही.

9 मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.

10 आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण देवाला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्यामध्ये नाही.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan