१ करिंथ 7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)विवाह व सूटपत्र ह्यांविषयीचे प्रश्न 1 तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी मी उत्तर देत आहे. पुरुषाने स्त्रीला स्पर्श न क रणे बरे. 2 परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. 3 पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा व एकमेकांचे समाधान करावे. 4 पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. 5 एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये. 6 मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर एक सवलत म्हणून सांगतो. 7 खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे. 8 आता जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, माझ्यासारखे एकटे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. 9 तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे. 10 परंतु विवाहितांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. 11 परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. 12 इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर एका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये 13 आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल, तर त्याला तिने घटस्फोट देऊ नये. 14 कारण पत्नीच्याद्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्याद्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे. असे नसते तर त्यांची मुलेबाळे अपवित्र असती. परंतु आता ती पवित्र आहेत. 15 तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते, तर ती वेगळी होवो, अशा प्रसंगी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनी बांधील नाहीत. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे; 16 कारण पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? किंवा पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? 17 ते काहीही असो, प्रत्येकाला प्रभूने नेमून दिलेले जीवन आणि प्रत्येकाला देवाने केलेले पाचारण ह्यानुसार त्याने चालावे. सर्व ख्रिस्तमंडळ्यांना मी हाच नियम घालून देतो. 18 सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंतेच्या खुणा काढून टाकू नयेत; कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये. 19 सुंता होणे किंवा सुंता न होणे ह्याला काही महत्त्व नाही तर देवाच्या आज्ञा पाळणे, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. 20 ज्याला ज्या स्थितीत पाचारण झाले असेल, त्याने त्याच स्थितीत राहावे. 21 तू गुलाम असता, तुला पाचारण झाले आहे काय? हरकत नाही, पण तुला स्वतंत्र होता येत असेल तर खुशाल स्वतंत्र हो; 22 कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले आहे, तो गुलामगिरीतून स्वतंत्र केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच स्वतंत्र असताना ज्याला पाचारण झाले आहे तो ख्रिस्ताचा दास आहे. 23 तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून माणसांचे गुलाम होऊ नका. 24 बंधुजनहो, ज्या स्थितीत पाचारण झाले असेल त्या स्थितीतच प्रत्येकाने देवाच्या सहवासात राहावे. 25 कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या प्रभूने त्याच्या कृपेने मला विश्वासपात्र ठरवले आहे, तो मी आपले मत सांगतो. 26 सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत जो ज्या स्थितीत असेल, त्या स्थितीत त्याने राहावे, हे त्याला बरे. 27 तू पत्नीला बांधील आहेस काय? असलास तर मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून विभक्त झाला आहेस काय? असलास तर लग्न करण्याचा विचार करू नकोस. 28 तथापि तू लग्न केलेस म्हणजे पाप केलेस, असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले, असेही होत नाही, मात्र अशांना ह्या जीवनात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत, अशी माझी इच्छा आहे. 29 बंधुजनहो, मला हेच सांगायचे आहे की, नेमलेला काळ कमी करण्यात आला आहे म्हणून ह्यापुढे ज्याला पत्नी आहे, त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे राहावे. 30 जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे 31 आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे राहावे कारण ह्या जगाचे बाह्यस्वरूप लयास जात आहे. 32 तुम्ही निश्चिंत असावे, अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभू कसा संतुष्ट होईल, अशी चिंता करतो. 33 परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतुष्ट करावे, अशा भौतिक गोष्टींची चिंता करतो. ह्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते. 34 जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी काळजी करते. परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे अशा सांसारिक गोष्टींविषयी उत्सुकता बाळगते. 35 तुमच्यावर बंधने आणण्यासाठी नव्हे तर तुमच्याकडून उत्तम आचरण घडावे व प्रभूची एकाग्रतेने सेवा व्हावी म्हणून मी हे तुमच्या हितासाठी सांगतो. 36 परंतु जर कोणाला असे वाटत असेल की, वाङ्निश्चय केलेल्या कुमारिकेबरोबर आपण अयोग्य प्रकारे वागतो आणि जर त्याच्या भावना अनावर होत असतील, तर त्याने लग्न करावे; तो पाप करत नाही. 37 तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला संयम आहे, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे आणि त्या कुमारिकेला तसेच राहू द्यावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो योग्य करतो. 38 जो त्या कुमारिकेबरोबर लग्न करतो तो योग्य करतो आणि जो लग्न करत नाही, तो अधिक योग्य करतो. 39 पती जिवंत आहे, तोपर्यंत पत्नी बांधील आहे. पती मरण पावल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ ख्रिस्ती माणसाबरोबर, लग्न करायला ती मोकळी आहे. 40 पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मलाही पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभते, असे मला वाटते. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India