Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ करिंथ 2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


तत्त्वज्ञान व प्रकटीकरण

1 बंधुजनहो, मी तुमच्याकडे आलो, तो वक्‍तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला घोषित करण्यास आलो नाही;

2 कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर चढवलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काहीही जमेस धरू नये, असा मी ठाम निश्चय केला होता

3 आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व अतिकंपित अवस्थेत आलो.

4-5 तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर आधारित असावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर पवित्र आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.

6 तथापि तुमच्यात जे अधिक ज्ञानी आहेत, त्यांना मी ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे किंवा ह्या युगाचे नष्ट होणारे जे अधिपती त्यांचेही नव्हे,

7 तर देवाचे गूढ व गुप्त ठेवलेले ज्ञान आम्ही सांगतो, जे देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या वैभवाकरिता नेमले होते.

8 ते ह्या युगातल्या अधिपतींतील कोणालाही कळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते, तर त्यांनी गौरवशाली प्रभूला क्रुसावर चढवले नसते.

9 धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व मानवी अंत:करणाला जे भिडले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सिद्ध केले आहे,

10 परंतु देवाने ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्यासाठी प्रकट केले, कारण पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन हेतूंचा शोध घेतो.

11 माणसाच्या अंतर्यामी वसणाऱ्या त्याच्या स्वतःच्या आत्म्यावाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही.

12 आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले, ते आपण ओळखून घ्यावे.

13 तर मग आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.

14 जो आध्यात्मिक नाही तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकत नाहीत; कारण त्यांची पारख आध्यात्मिक दृष्टीने होते.

15 जो आध्यात्मिक आहे, तो सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही.

16 धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘प्रभूचे मन कोणी ओळखले आहे की, त्याने त्याला शिकवावे?’ परंतु आपल्याला तर ख्रिस्ताची मनोवृत्ती लाभली आहे.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan