१ करिंथ 15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)मृतांचे पुनरुत्थान 1 बंधुजनहो, जे शुभवर्तमान मी तुम्हांला घोषित केले, ज्याचा तुम्ही स्वीकार केला, ज्याच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, 2 ज्याच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, त्याच शुभवर्तमानाची मी तुम्हांला आठवण करून देतो. जो संदेश मी तुम्हांला घोषित केला, तो संदेश तुम्ही दृढ धरला असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. 3 मला जे मिळाले, ते मी अत्यंत महत्त्वाचे समजून तुमच्या सुपूर्त केले, म्हणजेच पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांसाठी मरण पावला. 4 तो पुरला गेला आणि धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. 5 तो प्रथम पेत्राला व नंतर बारा जणांना दिसला. 6 त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, परंतु काही निधन पावले आहेत. 7 त्यानंतर तो याकोबला व पुढे सर्व प्रेषितांना दिसला 8 आणि जणू काही अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. 9 कारण प्रेषितांत मी सर्वांत कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणवून घेण्यास मी पात्र नाही; कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. 10 तरी जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे, ती व्यर्थ झाली नाही. उलट त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. 11 सारांश, मी असो किंवा ते असोत आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला आहे. 12 आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे, अशी त्याच्याविषयी घोषणा होत असताना मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे? 13 जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त उठवला गेला नाही 14 आणि ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ 15 आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षीदार ठरतो. कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवलेच जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठवले नाही. 16 मेलेले उठवले जात नसतील, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही 17 आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापांतच आहात. 18 तसेच येशूवर श्रद्धा ठेवणारे जे निधन पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे. 19 आपली ख्रिस्तावरील आशा केवळ ह्या जीवनासाठी उपयुक्त असेल आणि पुढे तिचा काहीच फायदा नसेल असे जर आपण समजत असाल, तर सबंध जगात आपल्यासारखे कीव करण्याजोगे आपणच! 20 परंतु वस्तुस्थिती ही आहे की, ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे. जे मरण पावले आहेत त्यांतला तो प्रथम फळ आहे. 21 खरोखर ज्याअर्थी मरण मनुष्याद्वारे आहे त्याअर्थी मेलेल्यांचे पुनरुत्थान मनुष्याद्वारे आहे. 22 जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. 23 पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे:प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ते त्याच्या आगमनकाळी. 24 नंतर शेवट होईल, त्यावेळी प्रत्येक अधिकार व प्रत्येक सामर्थ्यही तो नष्ट करील व राज्य देवपित्याच्या स्वाधीन करील; 25 कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. 26 जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. 27 पवित्र शास्त्रात म्हटले आहे, ‘देवाने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.’ परंतु सर्व अंकित केले आहे, असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही, हे उघड आहे. 28 त्याच्या अंकित सर्व काही झाले, असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की, देव सर्वांना सर्व काही होवो. 29 असे नसल्यास मेलेल्यांच्या वतीने जे बाप्तिस्मा घेतात त्यांचे काय? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत, तर त्यांच्या वतीने लोक बाप्तिस्मा का घेतात? 30 आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घातला असता? 31 बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधे मला तुमच्याविषयी जो अभिमान वाटतो त्याला स्मरून मी खरोखर सांगतो की, मी रोज मृत्यू स्वीकारतो! 32 जर केवळ मानवी आकांक्षेनुसार इफिस येथे मी श्वापदांना झुंज दिली, तर त्यात मला काय मिळाले? मेलेले उठवले जात नाहीत, तर धर्मशास्त्रानुसार ‘चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या आपण मरणार.’ 33 फसू नका; कुसंगतीने शील बिघडते, 34 नीतिमत्ता म्हणजे काय, ह्याबद्दल शुद्धीवर या आणि विवेकबुद्धीने वागा. पाप करू नका; कारण कित्येकांना देवाची ओळख नसते. तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी हे बोलतो. 35 आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? 36 हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही 37 आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. 38 पण देव त्याला त्याच्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. प्रत्येक बीजाला देव त्याचे अंग देतो. 39 सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसाचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. 40 तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे वैभव एक आणि पार्थिवांचे एक. 41 सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे; कारण ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत निरनिराळे प्रकार असतात. 42 तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते. 43 जे विरूपतेत व अशक्तपणात पेरले जाते, ते सौंदर्ययुक्त शक्तिमान स्वरूपात उठवले जाते, 44 भौतिक शरीर म्हणून पुरले जाते, आध्यात्मिक शरीर म्हणून उठवले जाते. अर्थात भौतिक शरीर आहे म्हणून आध्यात्मिक शरीरही असायला हवे. 45 कारण असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी म्हणून निर्माण करण्यात आला’; परंतु शेवटचा आदाम जीवनदायक आत्मा झाला. 46 तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही. भौतिक ते प्रथम, मग आध्यात्मिक. 47 पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. 48 जे ऐहिक आहेत, ते मातीचे आहेत आणि जे स्वर्गीय आहेत, ते जो स्वर्गातला आहे त्याच्यासारखे आहेत. 49 जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप आपण धारण करू. 50 बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि जे मर्त्य आहे त्याला अमरत्व मिळू शकत नाही. 51 ऐका, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच मरणार नाही, मात्र आपण सर्व जण बदलून जाऊ. 52 क्षणात, निमिषात, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, मेलेले ते अविनाशी स्वरूपात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. 53 जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. 54 विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे’ असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो पूर्ण होईल. 55 अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? 56 मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. 57 परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजयी करतो त्याला धन्यवाद! 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India