Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ करिंथ 12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)


पवित्र आत्म्याच्या दानांची विविधता

1 बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.

2 तुम्ही यहुदीतर होता तेव्हा जसे वळण तुम्हांला लावण्यात येत होते, तसे तुम्ही त्या निर्जीव मूर्तींकडे बहकले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे.

3 म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही, “येशू शापभ्रष्ट आहे”, असे म्हणू शकत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू प्रभू आहे”, असे म्हणता येत नाही.

4 कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो.

5 सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यांच्याद्वारे एकाच प्रभूची सेवा केली जाते

6 आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे.

7 सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो.

8 एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे शहाणपणाचे बोल मिळतात तर दुसऱ्याला त्याच पवित्र आत्म्याकडून विद्येची वाणी दिली जाते.

9 एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने,

10 अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्मे ओळखणे, अपरिचित भाषा बोलणे, निरनिराळ्या अपरिचित भाषांचा अर्थ सांगणे ही कृपादाने एकेकाला दिली जातात.

11 ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो.


शरीरावरून घेतलेले उदाहरण

12 जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे.

13 त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत.

14 कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते.

15 जर पाय म्हणेल, “मी हात नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही.

16 जर कान म्हणेल, “मी डोळा नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही.

17 सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती?

18 देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे.

19 ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते?

20 तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक आहे.

21 डोळा हाताला म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”

22 उलट, शरीराचे जे अवयव कमजोर दिसतात त्यांच्याविना आपले चालू शकत नाही.

23 शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांची आपण खास काळजी घेतो आणि आपल्या कुरूप अंगांना महत्त्व देतो.

24 आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना विशेष महत्त्व मिळावे अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे.

25 म्हणून शरीरात फूट नाही, तर अवयव एकमेकांची सारखीच काळजी घेत असतात.

26 एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुखावतात किंवा एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सुखावतात.

27 तुम्ही सर्व मिळून ख्रिस्ताचे शरीर असून एकेक जण त्याचे अवयव आहात.

28 देवाने ख्रिस्तमडंळीत प्रत्येकाला विशिष्ट जागी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्ये करणारे, आरोग्य देण्याचे कृपादान मिळालेले, साहाय्यक , नेतृत्व करणारे व अपरिचित भाषा बोलणारे असे नेमले आहेत.

29 सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय?

30 आरोग्य देण्याचे कृपादान सगळ्यांनाच मिळाले आहे काय? सगळेच अपरिचित भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय?

31 परंतु तुम्ही अधिक महान कृपादाने मिळवण्यासाठी झटा. मी मात्र तुम्हांला एक अधिक उत्कृष्ट मार्ग दाखवतो.

Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र

Copyright © 2018 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan