स्तोत्रसंहिता 146 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीपरमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती 1 परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर. 2 मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन. 3 अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका. 4 जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो. 5 ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे. 6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो. 7 तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो. 8 परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो. 9 परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो. 10 परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.