नहेम्या 9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीइस्त्राएलाच्या पापांबद्दल एज्राची कबुली 1 आता त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी गोणपाट घालून व डोक्यांत धूळ घालून एकत्र जमले. 2 इस्राएली वंशजांनी स्वतःला परकीयांपासून वेगळे केले. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पापांची आणि आपल्या पूर्वजांच्या वाईट कृत्यांची कबुली दिली. 3 ते आपल्या जागेवर उभे राहिले आणि आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचत राहिले. पुढे आणखी सहा तास त्यांनी आपल्या पातकांची कबुली दिली आणि आपला देव परमेश्वरापुढे नमन केले. 4 मग लेवी असलेले येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी, आणि कनानी जिन्यावर उभे राहिले आणि त्यांनी खूप मोठयाने परमेश्वर देवाचा धावा केला. 5 मग येशूवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदासर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो. 6 तू परमेश्वर आहे. तूच एक आहेस. तू आकाश, अत्युच्च आकाश, त्याबरोबर सर्व देवदूत लढाईसाठी त्यांची रचना करून निर्माण केलेस आणि ही पृथ्वी आणि तिच्यातील सर्वकाही आणि समुद्र आणि त्यातले सर्व काही तू केले. तू त्या सर्वांना जीवन देतोस आणि स्वर्गातील देवदूतांची सेना तुझी उपासना करते. 7 हे परमेश्वरा, तूच देव आहेस. ज्याने अब्रामाची निवड केली आणि बाबेलमधील (खास्द्यांच्या) ऊर नगरातून तू बाहेर काढून त्यास अब्राहाम असे नाव दिले. 8 तो तुझ्याशी निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास की, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याच्या वंशजांना द्यायचे वचन दिलेस. आणि तू ते पाळलेस. कारण, तू न्यायी आहेस. 9 मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास. आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ केलेला धावा तू ऐकलास. 10 फारोला तू चमत्कार दाखवलेस. त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस. कारण तुला माहित होते की, मिसर देशातील लोक त्यांच्याशी गर्वाने वागत होते. पण तू आपल्या नावासाठी केले ते आजवर आहे. 11 त्यांच्या डोळयांदेखत तू तांबडा समुद्र दुभागून दाखवलास. आणि ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरुन चालत गेले आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना खोल समुद्रात फेकून दिलेस जसा एखादा दगड खोल पाण्यात बुडावा. 12 दिवसा तू त्यांना मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री अग्नीस्तंभाने त्यांच्या वाटेवर प्रकाश दिला अशासाठी की त्याप्रकाशात ते चालू शकतील. 13 मग तू सीनाय पर्वतावर उतरलास आणि त्यांच्याशी आकाशातून बोललास आणि तू त्यांना योग्य निर्णय, खरी शिकवण, चांगले नियम आणि आज्ञा दिल्यास. 14 तुझ्या पवित्र शब्बाथाचा त्यांना परिचय करून दिलास आणि तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस. 15 ते भुकेले होते म्हणून तू त्यांना आकाशातून अन्न दिलेस. ते तहानलेले होते, म्हणून त्यांना खडकातून पाणी दिलेस. आणि तू त्यांना म्हणालास की, मी शपथपूर्वक तुम्हास दिलेल्या वचनदत्त जमिनीचा ताबा घ्या. 16 पण ते आणि आमचे पूर्वज उन्मत्त होऊन ताठ मानेचे बनले आणि त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. 17 त्यांनी ऐकण्याचे नाकारले व तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यामध्ये केलीस त्याचा विचार त्यांनी केला नाही परंतु ते हट्टी झाले. आणि त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी पुन्हा गुलामगिरी पत्करण्यास एक पुढारी नेमला. पण तू क्षमाशील, दयाळू, कृपाळू, सहनशील, प्रेमळ व मंदक्रोध असा देव आहेस म्हणून तू त्यांना सोडले नाहीस. 18 त्यांनी ओतीव धातुपासून वासरांची मूर्ती केली आणि आम्हास मिसर देशातून सोडवणारा हाच देव असे ते म्हणाले आणि त्यांनी खूप निंदा केली तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस. 19 तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्नीस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवीत राहिलास. 20 त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस, त्यांना तहान लागली असता पाणी दिलेस. 21 चाळीस वर्षे तू त्यांचे वाळवंटात पालनपोषण केलेस आणि त्यांना कशाचीही उणीव भासली नाही. त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत त्यांच्या पावलांना सूज आली नाही. 22 त्यांना तू राज्ये आणि लोक दिलेस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यांना ताब्यात मिळाले. 23 त्यांच्या वंशजांची संख्या तू आकाशातील तारकाप्रमाणे विपुल केलीस आणि त्यांना त्या प्रदेशात आणले. तू सांगितल्यावर त्यांच्या पूर्वजांनी तो प्रदेश ताब्यात घेतला. 24 या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला आणि तूच हा पराभव करवलास. हे देश, तिथले लोक आणि राजे यांना त्यांच्या हातात देऊन मन मानेल तसे वागू दिलेस. 25 त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला आणि सुपीक प्रदेश मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांनी ताब्यात घेतली, खोदलेल्या विहिरी त्यांना मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे यांचा त्यांनी ताबा घेतला, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तुझ्या महान चांगुलपणामुळे ते आनंदीत झाले. 26 आणि मग त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुध्द बंड केले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, ज्या संदेष्ट्यांनी तुझ्याकडे परत वळण्यासाठी सांगितले त्यांचा त्यांनी वध केला आणि त्यांनी तुझ्याविरूद्ध भयंकर दुराचरण केले. 27 म्हणून तू त्यांना शत्रूच्या ताब्यात दिलेस. शत्रूने त्यांना फार हैराण केले. अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुझा धावा केला आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास. तू फार कनवाळू आहेस. म्हणून त्यांची शत्रूपासून सुटका केलीस. 28 मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली. तेव्हा तू शत्रूकडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकलास आणि तुझ्या दयेस्तव अनेकदा त्यांना सोडवलेस. 29 त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस. तरी हट्टीपणाने वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जिवंत राहतो. पण त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेहि नाकारले. 30 अनेक वर्षे तू त्यांची गय केली. आपल्या आत्म्याने संदेष्ट्याद्वारे तू त्यांना बजावलेस. पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू शेजारील देशातल्या लोकांच्या हवाली केलेस. 31 पण तू दयाळू आहेस म्हणून तू त्यांचा समूळ संहार केला नाहीस, त्यांचा तू त्याग केला नाहीस कारण देवा, तू कृपाळू आणि दयाळू आहेस. 32 हे आमच्या देवा, महान, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, आमच्यावर अनेक आपत्ती आल्या त्यांना छोट्या समजू नकोस आणि आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या. 33 पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते. तुझे बरोबर होते आणि आम्ही दुष्टाई केली आहे. 34 आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले. 35 स्वत:च्या राज्यात राहत असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही. त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही. तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला. सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश याचा त्यांनी उपभोग घेतला. पण तरीही स्वत:च्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही. 36 आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत. या भूमीत, आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या या भूमीत आम्ही गुलाम आहोत. 37 या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत. 38 या सगळया गोष्टींमुळे आम्ही लेखी करार करत आहोत. त्यावर राजपुत्र, लेवी आणि याजक यांची नावे शिक्कामोर्तब केलेल्या दस्ताऐवजावर आहेत.” |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.