नहूम 3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीनिनवेचा समूळ नाश 1 पूर्ण रक्ताने भरलेल्या नगरीला धिक्कार असो! ती पूर्ण लबाडीने आणि चोरलेल्या मालमत्तेने भरली आहे; तिच्यात नेहमी बळी आहेत. 2 परंतु आता तेथे चाबकांच्या फटकाऱ्यांचे आवाज, चाकांच्या खडखडाटाचे ध्वनी, घोड्यांच्या टापांचे आणि रथाच्या घडघडाटाचे आवाज तुम्ही ऐकता. 3 लढाई करणाऱ्या घोडेस्वाराचे दृष्य, तलवारीचे चकाकणे, भाल्याची चमक, प्रेतांचा ढीग आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही; त्याचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत. 4 हे सर्व सुंदर वेश्येच्या वासनामय कृतीमुळे घडले आहे, जी निपुण चेटकी आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांना आणि चेटकीण कृतीने लोकांस विकते. 5 पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तुझी वस्त्रे तुझ्या तोंडापर्यंत वर उचलीन आणि राष्ट्रांना तुझे गुप्त भाग, राजांना तुझी लाज दाखवीन. 6 मी तुझ्यावर चिखल फेकून तुला तुच्छ करीन आणि तुला लाजिरवाणे करीन. प्रत्येकजण तुझ्याकडे पाहतील असे मी तुला करीन. 7 असे होईल की, जो कोणी तुला पाहील तो तुजपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे; तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू? 8 निनवे तू थेबेस, जी नील नदीच्यावर बांधली आहे, तिचे सभोवती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय? 9 कूशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लुबी यांची तिला मदत होती. 10 तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदीवासात गेली तिची तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठीत मनुष्यांवर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान मनुष्यांना साखळ्यांनी बांधून नेले. 11 तू सुध्दा दारूड्या होशील. तू लपण्याचा प्रयत्न करशील. तूही शत्रूपासून तुझी आश्रयाची जागा शोधशील. 12 तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होतील. जर ते हालविले, तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात. 13 पाहा, तुझे लोक तुझ्यामध्ये स्त्रियांप्रमाणे आहेत. तुझ्या देशाचे दारे तुझ्या शत्रूंना सताड उघडली आहेत. दारांचे लाकडी अडसर आग्नीने खाऊन टाकले आहेत. 14 वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ; तुझे किल्ले मजबूत कर; चिखलात उतर आणि पायांनी चुना तुडव; विटांची भिंत दुरूस्त कर. 15 तुला आग खाऊन टाकील, आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुडींनी येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो. 16 आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा तुझे व्यापारी पुष्कळ आहेत. परंतु ते चाटून खाणाऱ्या टोळासारखे आहेत; ते सर्व देश लुटून आणि नंतर दूर उडून जातील. 17 तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळांसारखे आहेत आणि तुझे सेनापती टोळ्याच्या झुंडीप्रमाणे आहेत; ते थंडीच्या दिवसात कुंपणांमध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कोठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही. 18 अश्शूराच्या राजा तुझे मेंढपाळ झोपले आहेत. तुझे सत्ताधारी विसावा घेत आहेत. तुझे लोक पर्वतांवर पांगले आहेत. आणि त्यांना जमविण्यास कोणीही नाही. 19 तुझी जखम बरी होणे शक्य नाही. तुझी जखम असाह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येकजण टाळ्या वाजवतात. तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे? |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.