मार्क 6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीयेशूचा नासरेथात अव्हेर मत्त. 13:53-58 ; लूक 4:16-30 1 नंतर येशू तेथून नासोरी या त्याच्या नगरात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. 2 शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या मनुष्यास ही शिकवण कोठून मिळाली? त्यास देवाने कोणते ज्ञान दिले आहे आणि याच्या हातून हे केवढे चमत्कार होतात? 3 जो सुतार, मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना?” आणि या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय? त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला. 4 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या नगरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात त्याचा सन्मान होत नसतो.” 5 थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही. 6 त्यांच्या अविश्वासामुळे त्यास आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला. बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठविणें मत्त. 10:1 ; 10:5-15 ; लूक 9:1-6 7 नंतर येशूने बारा शिष्यांना आपणाकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला. 8 आणि त्यास आज्ञा केली की, “काठीशिवाय प्रवासासाठी दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. 9 तरी चपला घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.” 10 आणखी तो त्यास म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडीपर्यंत राहा. 11 आणि ज्याठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.” 12 मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली. 13 त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून त्यांना बरे केले. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध मत्त. 14:1-12 ; लूक 9:7-9 14 हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.” 15 इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.” 16 परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.” 17 हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते. 18 व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” 19 याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही, 20 कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे. 21 मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली. 22 हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” 23 तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” 24 ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” 25 आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.” 26 राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही. 27 तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. 28 ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. 29 हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले. बारा प्रेषितांचे परत येणे मत्त. 14:13-21 ; लूक 9:10-17 ; योहा. 6:1-14 30 यानंतर प्रेषित येशूभोवती जमले आणि त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्यास सांगितले. 31 नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती. 32 तेव्हा ते सर्वजण तारवात बसून रानात गेले. 33 परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदरच ते तेथे पोहोचले. पाच हजारांना भोजन 34 येशू किनाऱ्याला आल्यावर, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्यास त्यांचा कळवळा आला; म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. 35 दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. 36 लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” 37 परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?” 38 तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” 39 येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. 40 तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. 41 येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले. 42 मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले. 43 आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. 44 भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते. येशू पाण्यावरून चालतो मत्त. 14:22-33 ; योहा. 6:15-21 45 नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. 46 लोकांस निरोप देऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. 47 संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. 48 मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. 49 पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. 50 कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.” 51 नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. 52 कारण त्यांना भाकरीची गोष्ट समजली नव्हती आणि त्यांची मने कठीण झाली होती. येशू गनेसरेत येथील रोग्यांना बरे करतो मत्त. 14:34-36 53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतला आले व तारु बांधून टाकले. 54 ते तारवातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले. 55 आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे लोक दुखणेकऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. 56 तो गावात किंवा शेतमळ्यात कोठेही जावो, तेथे लोक दुखणेकऱ्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्यास विनंती करीत आणि जितक्यांनी त्यास स्पर्श केला तितके बरे झाले. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.