मत्तय 18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीनम्रतेविषयी धडा मार्क 9:33-37 ; लूक 9:46-48 1 त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?” 2 तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, 3 आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. 4 म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. 5 आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो. दुसर्यांस अडखळविणाऱ्यांना इशारा मार्क 9:42-48 ; लूक 17:1 , 2 6 परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे. 7 अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो! तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल. 8 जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीत तुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. 9 जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे. 10 सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात. 11 आणखी, जे हरवलेले त्यास तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे.” भटकलेल्या मेंढराचा दुष्टांत 12 जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही? 13 आणि जर त्या मनुष्यास हरवलेले मेंढरू सापडले तर त्यास कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. असे मी तुम्हास खरे सांगतो, 14 तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही. अपराध करणाऱ्या बरोबर कसे वागावे 15 जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस. 16 पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, 17 जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज. 18 मी तुम्हास खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले. सामुदायिक प्रार्थना 19 तसेच मी तुम्हास खरे सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल; 20 कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे. कृतघ्न चाकराचा दुष्टांत 21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?” 22 येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.” 23 म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले. 24 जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले. 25 त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी. 26 परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन. 27 त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. 28 नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे. 29 परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. 30 पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते. 31 घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. 32 तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33 म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?” 34 मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही. 35 “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.” |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.