यहोशवा 10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीअमोरी लोकांचा पराभव 1 यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते. 2 तेव्हा यरूशलेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योद्धे होते. 3 मग यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला, 4 “वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.” 5 तेव्हा यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले. 6 हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत. 7 तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.” 8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.” 9 यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला 10 आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले. 11 ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले. 12 परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.” 13 तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. 14 असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता. 15 मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला. 16 ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले. 17 मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले. 18 तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा. 19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे. 20 यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले. 21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही. 22 मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.” 23 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले. 24 ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले. 25 यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.” 26 नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते. 27 सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत. 28 त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले. 29 मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली; 30 परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले. 31 त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरुध्द लढला. 32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला. 33 तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकांस एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही. 34 मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले. 35 त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला. 36 मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले; 37 त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचा समूळ नाश केला. 38 नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरुध्द लढला. 39 त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले. 40 या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला. 41 यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला. 42 हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता. 43 मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्राएल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.