Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यिर्मया 52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


सिद्कीयाची कारकीर्द

1 सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षाचा होता; अकरा वर्षे त्याने यरूशलेमेवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्नाकर यिर्मयाची मुलगी होती.

2 यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले.

3 आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरूशलेम व यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले.


यरूशलेमेचा पाडाव

4 मग असे झाले की, त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दहाव्या दिवशी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सर्व सैन्याबरोबर यरूशलेमेविरूद्ध चाल करून आला. त्याने त्याच्यापुढे तळ ठोकला आणि त्यांच्याभोवती वेढ्याची भिंत बांधली

5 म्हणून सिद्कीया राजाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता.

6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता.

7 मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.

8 पण खास्द्यांच्या सैन्याने राजाच्या पाठीस लागून यरीहोच्या मैदानात सिद्कीयाला गाठले. त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले.

9 त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.

10 बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली.

11 मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.

12 आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरूशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.

13 त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.

14 राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खास्दी सैन्याने यरूशलेमेभोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली.

15 सेनापती नबूजरदानाने यरूशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरूशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.

16 पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.

17 परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले.

18 पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली.

19 पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुप्याचे बनवली होती ती राजाचा अंगरक्षकांचा नायक तीदेखील घेऊन गेला.

20 दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते.

21 प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.

22 त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.

23 असे तेथे कळसाच्या चाऱ्ही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती आणि जाळीकामावर सभोवती सर्व डाळिंबे शंभर होती.

24 अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले.

25 सैनिकांवर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे सात माणसे राजाला सल्ला देत, ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याप्रमाणेच मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस, त्यांच्याबरोबर देशातील नगरात असलेले साठ महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले.

26 नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले.

27 रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.

28 नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.

29 नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरूशलेमेमधून नेले.

30 नबुखद्नेस्सराच्या राजाच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा अंगरक्षक नबूजरदान याने यहूदातले सातशे पंचेचाळीस लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून चार हजार सहाशे होते.


यहोयाखीनाची तुरुंगातून सुटका
2 राजे 25:27-30

31 मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले.

32 तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बाबेलात होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले.

33 अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले.

34 आणि त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याच्या मृत्यूपर्यंत त्यास प्रत्येक दिवशी बाबेलाचा राजा नियमीत भोजनाचा भत्ता देत असे.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan