यिर्मया 48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीमवाबाविषयी भविष्य 1 मवाबाविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलांचा देव, असे म्हणतोः “नबोला हायहाय, कारण ते उध्वस्त झाले आहे. किर्या-थाईम काबीज केले गेले आहे आणि त्याची मानहानी झाली आहे. तिचे किल्ले पाडण्यात आणि अप्रतिष्ठीत केले गेले आहेत. 2 मवाबाचा आदर राहिला नाही. हेशबोनात त्यांच्या शत्रूने तिच्याविरूद्ध अनिष्ट योजिले आहे. ते म्हणाले, ‘या व आपण तिचा राष्ट्राप्रमाणे नाश करू.’ मदमेनासुद्धा नाश होईल, तलवार तुझ्या पाठीस लागेल. 3 पाहा, होरोनाईमातून जुलूम व मोठा नाश होत आहे, असा किंकाळीचा आवाज येत आहे. 4 मवाबाचा नाश झाला आहे. तिची मुले ऐकू येईल असे रडत आहे. 5 ते रडत रडत लूहीथाच्या टेकडीवर चढत आहेत, कारण खाली होरोनाईमाच्या रस्त्यांवर नाशामुळे किंकाळ्या ऐकू येत आहेत. 6 पळा! आपले जीव वाचवा व रानातल्या झाडाप्रमाणे व्हा. 7 कारण तू आपल्या कर्मावर आणि संपत्ती यावर भाव ठेवला आहे, म्हणून तुही पकडला जाशील. मग कमोश आपले याजक आणि पुढाऱ्यांसह बंदिवासात जाईल. 8 कारण नाश करणारा प्रत्येक नगरात येईल. एकही नगर सुटणार नाही. परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल व पठारेही उध्वस्त होतील. 9 मवाबाला पंख द्या, कारण तिला खचित दूर उडून जाता यावे. तिची नगरे टाकाऊ होतील, तेथे त्यामध्ये कोणी राहणार नाही. 10 जो कोणी परमेश्वराच्या कामात आळशी आहे तो शापीत आहे; आणि जो कोणी आपली तलवार रक्तपातापासून आवरतो तोही शापित आहे. 11 मवाब लहानपणापासून सुरक्षित आहे. तो त्याच्या द्राक्षरसासारखा आहे त्यास या पात्रातून त्या पात्रात कधीच ओतले नाही. तो बंदिवासात कधी गेला नाही. म्हणून त्याची चव जितकी चांगली तितकी कायम आहे, आणि त्याचा वास न बदलता टिकून आहे.” 12 याकरीता परमेश्वर असे म्हणतो, “पाहा असे दिवस येत आहे की, मी त्याच्याकडे द्राक्षरस ओतणारे पाठवीन, तेव्हा ते त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्यांचे बुधले तुकडे तुकडे करतील.” 13 मग जसे इस्राएलाचे घराणे आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला तसा मवाब कमोशाविषयी लज्जित होईल. 14 “आम्ही सैनिक, बलवान लढणारी माणसे आहोत असे तुम्ही कसे म्हणू शकता? 15 मवाब उजाड होईल आणि त्याच्या नगरावर हल्ला होईल. कारण त्याचे उत्तम तरुण वधाच्या जागी खाली उतरून गेले आहेत.” हे राजाचे सांगणे आहे, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. 16 मवाबाचे अरिष्ट लवकरच घडणार आहे; त्याची विपत्ती अत्यंत त्वरा करीत आहे. 17 जे सर्व तुम्ही मवाबासभोवती आहात विलाप कराल. आणि जे सर्व तुम्ही त्याची किर्ती जाणता, ते तुम्ही त्याच्यासाठी आक्रंदन करा, बळकट दंड, आदराची काठी तुटली आहे. 18 अगे तू दीबोनात राहणाऱ्या कन्ये, तू आपल्या मानाच्या जागेवरून खाली ये आणि कोरड्या जमिनीवर बस. कारण मवाबाचा विनाश करणारा तुझ्यावर आला आहे तो तुझे बालेकिल्ले नष्ट करील. 19 अरोएरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पाहा! जे कोणी पळून व निसटून जात आहेत, त्यांना विचारा, काय झाले आहे? 20 मवाब लज्जित झाला आहे, कारण त्याचे तुकडे तुकडे झाले आहेत. आक्रोश आणि विलाप करा; मदतीसाठी रडा. मवाबाचा नाश झाला आहे आर्णोन नदीकाठच्या लोकांस सांगा. 21 आता डोंगराळ प्रदेशावर शिक्षा आली आहे, होलोनावर, याहस व मेफाथ 22 दीबोन, नबो, बेथ-दिबलाथाईम 23 किर्या-थाईम, बेथ-गामूल व बेथ-मौन यांचा 24 करोयोथ, बस्रा व मवाब देशामधील दूरची व जवळची नगरे यांवर न्यायनिवाडा आला आहे. 25 मवाबाचे शिंग तोडून टाकले आहे. त्याचा बाहू मोडला आहे. असे परमेश्वर म्हणतो. 26 “त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरूद्ध गर्वाने कृती केली आहे. आता मवाब स्वत:च्याच वांतीत हाताने टाळ्या वाजविल, म्हणून तोही हास्यविषय होईल. 27 कारण इस्राएल तुझ्या हास्याचा विषय झाला नव्हता का? तो चोरांमध्ये सापडला होता का? जितकेदा तू त्याच्याविषयी बोललास तितकेदा तू आपली मान हालवलीस. 28 मवाबात राहणाऱ्यांनो, नगरे सोडून द्या आणि सुळक्यावर तळ द्या. खडकाच्या खळग्याच्या तोंडावर घरटे करणाऱ्या पारव्यांसारखे व्हा.” 29 “आम्ही मवाबाचा गर्व ऐकला आहे. त्याचा उद्धटपणा, त्याचा गर्विष्ठपणा, अहंकार, अभिमान आणि त्याच्या हृदयातली उन्मत्तता ही आम्ही ऐकली आहे.” 30 परमेश्वर असे म्हणतो, मला स्वतःला त्याचे उर्मट बोलणे, त्याच्या कृत्यासारखी त्याची पोकळ बढाई मला माहित आहे. 31 म्हणून मी मवाबासाठी आक्रोश करून विलाप करीन आणि सर्व मवाबासाठी दुःखाने आरोळी मारीन. कीर हरेसाच्या लोकांसाठी मी आक्रंदन करील. 32 हे सिब्मेच्या द्राक्षवेली, मी याजेरासाठी रडलो त्यापेक्षा तुझ्यासाठी मी अधिक रडेन. तुझ्या फांद्या क्षारसमुद्रापलीकडे गेल्या होत्या आणि त्या याजेरापर्यंत पोहोचल्या होत्या; पण विनाशकाने तुझ्या उन्हाळी फळांवर व तुझ्या द्राक्षांवर हल्ला केला आहे. 33 म्हणून मवाबाच्या फळबागेतून व देशातून उत्सव व हर्ष दूर केलेले आहेत. मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षरस नाहीसा केला आहे. ते हर्षाने ओरडून द्राक्षे तुडविणार नाहीत. कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही. 34 “हेशबोनापासून एलालेपर्यंत, याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम व एगलाथ-शलिशीयापर्यंत त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे, कारण निम्रीमाचे पाणी सुद्धा आटले आहे. 35 परमेश्वर असे म्हणतो, कारण जो कोणीही उच्चस्थानी अर्पण करतो आणि त्यांच्या देवाला धूप जाळतो त्यास मी मवाबातून नाहीसे करीन.” 36 म्हणून माझे हृदय मवाबासाठी बासरीसारखे विलाप करीत आहे, माझे हृदय कीर हरेसाच्या लोकांसाठी बासरीसारखे विलाप करीत आहे. त्यांनी मिळवलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे. 37 कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुंडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे. 38 मवाबामध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि चौकात, तेथे सर्वत्र शोक होत आहे. कारण नकोसा असलेल्या पात्राप्रमाणे मी मवाबाचा नाश केला आहे, असे परमेश्वर म्हणतो. 39 “तो कसा मोडला आहे! आपल्या विलापात कसे आकांत करत आहे! मवाबाने लज्जेने कशी पाठ फिरवली आहे. म्हणून मवाब आपल्या सभोवतालच्या सर्वांना उपहास आणि दहशतीचा विषय झाला आहे.” 40 कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, शत्रू गरुडाप्रमाणे उडत आहे. तो आपले पंख मवाबावर पसरील. 41 करोयोथ काबीज झाले आहे आणि त्यांचे बालेकिल्ले जप्त झाले आहेत. कारण त्या दिवशी मवाबी सैनिकांचे हृदय, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल. 42 म्हणून मवाबाचा नाश होऊन ते राष्ट्ररुप राहणार नाही, कारण ते परमेश्वराविरूद्ध उद्धट झाले.” 43 परमेश्वर असे म्हणतोः “मवाबात राहणाऱ्यांनो, दहशत व खाच आणि सापळा तुमच्यावर येत आहेत. 44 जो कोणी दहशतीने घाबरुन पळेल तो खाचेत पडेल, आणि जो कोणी खाचेतून वर येतो तो सापळ्यात सापडेल, कारण मी हे त्याच्याविरुध्द म्हणजे मवाबावर त्याचे शासन घेण्याचे वर्ष आणिन.” असे परमेश्वर म्हणतो. 45 जे पळून गेले होते ते हेशबोनाच्या छायेखाली निर्बल असे उभे राहिले, कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघाली आहे. ती मवाबाचे कपाळ आणि गर्विष्ठ लोकांचे डोके खाऊन टाकील. 46 हे मवाबा, तुला हाय हाय! कमोशाच्या लोकांचा नाश होत आहे, कारण तुझी मुले बंदिवान आणि तुझ्या मुली बंदिवासात नेल्या जात आहेत. 47 “मी पुढील दिवसात मवाबाचा बंदिवास उलटवीन” असे परमेश्वर म्हणतो. येथे मवाबाचा न्यायनिवाडा संपतो. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.