Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

शास्ते 9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


अबीमलेखाची कारकीर्द

1 यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले,

2 “तुम्ही कृपाकरून शखेमांतल्या सर्व मनुष्यास सांगा म्हणजे ते ऐकतील, यरूब्बालाच्या सर्व सत्तर मुलांनी तुम्हावर राज्य करावे किंवा एका मुलाने तुम्हावर राज्य करावे? यांतून तुम्हास कोणते चांगले वाटते? मी तुमच्या हाडाचा व मांसाचा आहे याची आठवण करा.”

3 तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व मनुष्यांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, “तो आमचा भाऊ आहे.”

4 त्यांनी त्यास बआल-बरीथाच्या घरातून सत्तर शेकेल रुपे दिले, आणि अबीमलेखाने बेकायदेशीर व बेदरकार स्वभावाची माणसे भाडयाने ठेवली. यास्तव ती त्याच्यामागे चालली.

5 तो आपल्या वडिलाच्या घरी अफ्रासास गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता.

6 मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले.

7 नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. “त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका.

8 झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, ‘तू आमचा राजा हो.’

9 तेव्हा जैतूनाने त्यांना म्हटले, झाडांवर अधिकार करायास जावे म्हणून, ज्याने देवाचा व मनुष्याचा सन्मान करीतात, ते माझे तेल मी सोडून देऊ काय?

10 नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले, ‘तू चल, आमचा राजा हो.’

11 तेव्हा अंजिराने त्यांना म्हटले, ‘मी आपली गोडी व आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?’

12 नंतर त्या झाडांनी द्राक्षवेलाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’

13 तेव्हा द्राक्षवेलाने त्यांना म्हटले, मी आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांना संतुष्ट करतो, तो सोडून झाडावर अधिकार करायला जावे की काय?

14 नंतर त्या सर्व झाडांनी काटेरी झुडुपाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’

15 तेव्हा काटेरी झुडपाने त्या झाडांना म्हटले, ‘जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाही तर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्याचे गंधसरूस जाळून टाकील.’

16 यास्तव आता तुम्ही विचार करा की, खरेपणाने व प्रामाणिकपणाने वर्तणूक करून तुम्ही अबीमलेखाला राजा केले आहे का? आणि यरूब्बालासंबंधी आणि त्याच्या घराण्यासंबंधी जर तुम्ही बरे केले का आणि त्याच्या हातांच्या कृत्यांनुसार त्यास शिक्षा केली आहे काय?

17 आणि विचार करा की, माझ्या वडिलाने तुमच्यासाठी लढाई केली, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवले आहे.

18 परंतु तुम्ही आज माझ्या वडिलाच्या घरावर उठला, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसे, यांना तुम्ही एका शिळेवर जिवे मारले, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमलेख याला शखेमातल्या मनुष्यांवर राजा करून ठेवले, कारण तो तुमचा भाऊ आहे.

19 तर तुम्ही आजच्या दिवशी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व प्रामाणिकपणाने जर वर्तणूक केली असेल, तर अबीमलेखामध्ये संतोष करा; त्यानेही तुमच्यामध्ये संतोष करावा.

20 परंतु जर तसे नाही, तर अबीमलेखातून विस्तव निघून शखेमातील व मिल्लोतील मनुष्यांना जाळून टाको, आणि शखेमातल्या व मिल्लोतील मनुष्यांतून विस्तव निघून अबीमलेखाला जाळून टाको.”

21 नंतर योथाम पळून गेला व आपला भाऊ अबीमलेख ह्याच्या भीती पोटी तो बैर येथे जाऊन राहिला.

22 तेव्हा अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले.

23 नंतर देवाने अबीमलेख व शखेमातली माणसे यांच्यामध्ये दुष्ट आत्मा पाठवला, म्हणून शखेमातले लोक अबीमलेखाशी कपटाने वागू लागले;

24 देवाने हे केले, यासाठी की, यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांच्या विरोधात केलेल्या हिंसाचाराचा बदला घ्यावा, व त्यांच्या रक्तपाताबद्दल त्यांचा भाऊ अबीमलेख दोषी ठरवला जावा; आणि त्याच्या भावांचा खून करण्यात त्यास मदत केली म्हणून, शखेम नगरातील लोकही जबाबदार धरले जावेत.

25 नंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यासाठी डोंगराच्या शिखरावर दबा धरणारे ठेवले, आणि त्यांनी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्यास लुटले. हे कोणीतरी अबीमलेखाला सांगितले.

26 मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसह आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

27 तेव्हा त्यांनी शेतात जाऊन आपल्या द्राक्षमळ्यांची खुडणी करून द्राक्षांचा रस काढला आणि ते उत्साह करीत आपल्या देवाच्या घरात गेले, आणि तेथे खाऊन पिऊन त्यांनी अबीमलेखाला शाप दिला.

28 तेव्हा एबेदाचा पुत्र गाल बोलला, “अबीमलेख कोण आहे की आम्ही त्याचे दास असावे? यरूब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबुल हे शखेमाचा बाप हमोर यांच्या कुळांतील लोकांचे दास असतील पण आम्ही अबीमलेखाची सेवा का करावी?

29 आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमलेखाला काढून टाकले असते. मी अबीमलेखाला म्हणेन, तू आपले सैन्य बाहेर बोलाव.”

30 त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला.

31 मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, “पाहा, एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावत आहेत.

32 तर आता, तू आपल्याजवळच्या लोकांसह रात्री उठून शेतात दबा धर.

33 मग असे व्हावे की, सकाळी सूर्य उगवताच तू उठून नगरावर हल्ला कर; मग पाहा, ते आपल्याजवळच्या लोकांसह तुझ्याकडे बाहेर येतील, तेव्हा जसे तुझ्या हाती येईल तसे तू त्याचे कर.”

34 यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसह रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला.

35 मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेशीजवळ उभा राहिला, आणि अबीमलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला.

36 तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, “पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात.” मग जबुल त्यास बोलला, “तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते.”

37 तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, “पाहा, देशाच्या उंचवटयावरून लोक उतरतात; आणि एक टोळी एलोन मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.”

38 मग जबुल त्यास बोलला, “तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमलेख कोण की, आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर.”

39 मग गालाने शखेमातल्या मनुष्यांपुढे होऊन, बाहेर जाऊन अबीमलेखाशी लढाई केली.

40 तेव्हा अबीमलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेशीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले.

41 मग अबीमलेख आरूमा शहरात राहिला, जबुलाने गाल व त्याचे नातेवाईक ह्यांना शखेममधून हाकलून दिले.

42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक बाहेर शेतात गेले. ही बातमी अबीमलेखाला समजली.

43 तेव्हा त्याने आपल्या लोकांच्या तीन तुकड्या केल्या; ते शेतात दबा धरून बसले, लोक नगरातून बाहेर येत आहेत हे त्याने पाहिले आणि त्यांच्यावर हल्ला करून त्याने त्यांना ठार मारले.

44 अबीमलेख व त्याच्यासोबतच्या तुकड्यांनी हल्ला करून शहराचे दरवाजे रोखून धरले. इतर दोन तुकड्यांनी शेतात असलेल्या लोकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले.

45 अबीमलेखाने दिवसभर त्या नगराशी लढाई केली. त्याने शहराचा ताबा घेतला व त्यातील लोकांस जिवे मारले, आणि नगर उद्‌ध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकले.

46 शखेमच्या सर्व पुढाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा ते सर्वजण अल बरीथच्या किल्ल्यात गेले.

47 सर्व पुढारी शखेमच्या बुरुजात जमा झाले आहेत असे अबीमलेखाला कोणी सांगितले.

48 तेव्हा अबीमलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत सल्मोन डोंगरावर गेला, आणि अबीमलेखाने आपल्या हाती कुऱ्हाड घेऊन झाडाची फांदी तोडली, मग तिला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन त्याने आपल्याजवळच्या लोकांस सांगितले, “जे मी केले ते तुम्ही पाहिले, तसे माझ्यासारखे लवकर करा.”

49 तेव्हा सर्व लोकांतल्या एकएकाने फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमलेखाच्या मागे चालले; मग त्यांनी, त्या फांद्या बुरुजाला लावल्या व ते लोक आत असता बुरूजाला आग लावली; अशा प्रकारे शखेमाच्या बुरुजातले सर्व पुरुष व स्त्रिया मिळून सुमारे एक हजार इतके लोक मरण पावले.

50 नंतर अबीमलेख तेबेस शहरास गेला, आणि त्याने तेबेसला वेढा देऊन ते घेतले.

51 परंतु त्या नगरात एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरुष स्त्रियांसह म्हणजे त्या नगरातली सर्व माणसे त्यामध्ये पळून गेली आणि आपल्यामागे दरवाजा बंद करून बुरूजाच्या धाब्यावर चढली.

52 नंतर अबीमलेख त्या बुरूजाजवळ आला आणि त्याच्याविरुध्द लढला, आणि बुरूजाला आग लावून जाळायला त्याच्या दाराजवळ गेला.

53 तेव्हा एका स्त्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकली.

54 तेव्हा त्याने त्याची हत्यारे वाहणाऱ्या तरुणाला घाईघाईने हाक मारून सांगितले, “तू आपली तलवार काढून मला जिवे मार, नाही तर स्त्रीने त्यास मारले. असे माझ्याविषयी म्हणतील.” म्हणून त्यास तरुणाने त्यास भोसकल्यावर तो मेला.

55 मग अबीमलेख मेला हे पाहून इस्राएली माणसे आपापल्या ठिकाणी गेली.

56 तर अबीमलेखाने जी दुष्टाई आपल्या सत्तर भावांना जिवे मारण्याने आपल्या पित्याविषयी केली होती, तिचा देवाने त्याच्यावर सूड घेतला.

57 आणि शखेमातल्या मनुष्यांचीही सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लावली; याप्रमाणे यरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यास भोवला.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan