यशायाह 13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीबाबेलाविषयी देववाणी 1 आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा. 2 उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा. 3 मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे. 4 अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे. 5 ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे. 6 आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे. 7 त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे; 8 ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील. 9 पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे. 10 आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही. 11 मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील. 12 मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील. 13 म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल. 14 शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल. 15 जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल. 16 त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील. 17 पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही. 18 त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत. 19 आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल. 20 ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत. 21 परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील; आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील. 22 तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.