यशायाह 1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीपातकी राष्ट्र 1 आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला. 2 हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः “मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली. 3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.” 4 अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे. 5 तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे. 6 पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही; फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही. 7 तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत. परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत. 8 सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे. 9 जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती. खऱ्या पश्चात्तापासाठी आवाहन 10 सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या. 11 परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;” 12 जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले? 13 पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही. 14 तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे. 15 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत. 16 स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा; 17 चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा. 18 परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील. 19 जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल. 20 परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे. सीयोनेचा न्याय व उद्धार 21 विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती, पण ती आज खुन्यांनी भरून गेली आहे. 22 तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे. 23 तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत. 24 यांकरीताच प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो कीः “त्यांचा नाश होवो! मी माझ्या विरोधकांचा सूड घेईन, आणि माझ्या शत्रू विरूद्ध मी स्वतः बदला घेईन; 25 मी तुजविरूद्ध आपला हात वळवून, तुझे शुद्धीकरण करून तुझ्यातील निरुपयोगी गोष्टी काढून सर्व प्रकारची अशुद्धता दूर करीन. 26 मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन, त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.” 27 सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल. 28 बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल. 29 “तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल, आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील. 30 कारण तुम्ही पाने कोमजलेल्या एलाच्या झाडाप्रमाणे, व पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. 31 बलाढ्य मनुष्य वाळलेल्या झाडाच्या ढिलपीप्रमाणे दुर्बल होईल व त्याची कामे जाळाच्या लहानशा ठिणगीसारखी राहतील; ती दोन्ही एकत्र जाळण्यात येतील, तो त्यास कोणीही विझवणार नाही.” |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.