Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

2 थेस्सल 2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


प्रभू येशूच्या पुनरागमनासंबंधी असलेल्या चुकीच्या कल्पना

1 बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की,

2 तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका;

3 कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल;

4 तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.

5 मी तुमच्याबरोबर असतांना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय?

6 त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे.

7 कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील;

8 मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील;

9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल

10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.

11 त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;

12 ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.


आणखी उपकारस्तुती व प्रार्थना

13 प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;

14 त्यामध्ये त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.

15 तर मग बंधूनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा.

16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकाळचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,

17 तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan