Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ शमुवेल 18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


अबशालोमाचा मृत्यू

1 दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार मनुष्यांवर अधिकारी, सरदार नेमले.

2 सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, मी ही तुमच्याबरोबर येतो.

3 पण लोक म्हणाले नाही तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांस त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात रहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला येणारच.

4 तेव्हा दावीद राजा लोकांस म्हणाला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले.

5 यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली माझ्यासाठी एक करा, अबशालोमशी सौम्यपणाने वागा राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.

6 अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमाच्या अरण्यात ते लढले.

7 दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली.

8 देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मरण पावली.

9 अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला, तेव्हा अबशालोम खेचरावर बसून निसटायचा प्रयत्न करू लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.

10 एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.

11 यवाब त्या मनुष्यास म्हणाला, मग तू त्याचा वध करून त्यास जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुद्रा आणि एक पट्टा इनाम दिला असता.

12 तो मनुष्य म्हणाला, तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय, आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.

13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.

14 यवाब म्हणाला, इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. अबशालोम अजून जिवंत असून एलावृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने तीन भाले घेतले आणि ते अबशालोमवर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले.

15 यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला.

16 यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांस अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले.

17 यवाबाच्या मनुष्यांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. त्यावर दगडांची रास रचून तो खंदक भरून टाकला. अबशालोमाबरोबर आलेल्या इस्राएलींनी पळ काढला आणि ते घरी परतले.

18 अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला पुत्र नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वत:चेच नाव दिले होते. आजही तो अबशालोम स्मृतीस्तंभ म्हणून ओळखला जातो.

19 सादोकाचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्यास सांगतो.

20 यवाब त्यास म्हणाला, आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा पुत्र मरण पावला आहे.

21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग त्या मनुष्याने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.

22 सादोकाचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली. काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे. यवाब म्हणाला मुला तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.

23 अहीमास म्हणाला; “काहीही होवो, मला धावत जाऊ द्या.” तेव्हा यवाबाने त्यास म्हटले, “धाव.” अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.

24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास एक मनुष्य धावत येताना दिसला.

25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दावीद म्हणाला, तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे. धावता धावता तो मनुष्य शहराच्या जवळ येऊन पोहचतो तोच,

26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, तो पाहा आणखी एक मनुष्य एकटाच धावत येतोय तेव्हा राजा म्हणाला, तो ही बातमी आणतोय.

27 पहारेकरी म्हणाला, पहिल्याचे धावणे मला सादोकाचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते. राजा म्हणाला, अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार

28 अहीमासने “सर्व कुशल असो, असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”

29 राजाने विचारले अबशालोमचे कुशल आहे ना? अहीमास म्हणाला, यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.

30 राजाने मग त्यास बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.

31 मग तो कूशी आला. तो म्हणाला, माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरूद्ध पक्षाच्या लोकांस परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.

32 राजाने त्यास विचारले, अबशालोम ठीक आहे ना? त्यावर कूशीने सांगितले तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणासा सारखी, अबशालोमासारखीच गत होवो.

33 यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले. तो फार शोकाकुल झाला. वेशीच्या भिंतीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्यास रडू कोसळले, आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, “अबशालोम, माझ्या पुत्रा, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते माझ्या पुत्रा!”

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan