२ शमुवेल 15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीअबशालोम दाविदाविरुद्ध बंड पुकारतो 1 यानंतर अबशालोमने स्वत:साठी रथ आणि घोड्यांची तयारी केली, तो रथातून जात असताना पन्नास माणसे त्याच्यापुढे धावत असत. 2 रोज लवकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई. आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांस भेटून त्यांच्याशी बोलत असे. चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे, मी इस्राएलच्या अमुक वंशातला. 3 तेव्हा अबशालोम म्हणे, तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही. 4 अबशालोम पुढे म्हणे, मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करू शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन. 5 अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्यास आभिवादन करू लागला, तर अबशालोम त्या मनुष्यास मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करून तो त्यास स्पर्श करी त्याचे चुंबन घेई. 6 राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली. 7 पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या. 8 अराममधील गशूर येथे राहत असताना मी तो बोललो होतो, परमेश्वराने मला पुन्हा यरूशलेमेला नेले, तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो. 9 तेव्हा राजा दावीदाने त्यास निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले. अबशालोम हेब्रोन येथे आला. 10 पण त्याने इस्राएलच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकांस कळवले रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे असा तुम्ही घोष करा. 11 अबशालोमने स्वत:बरोबर दोनशे माणसे घेतली यरूशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती. 12 अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्यास अधिकाधिक पाठिंबा मिळत होता. 13 एका निरोप्याने दाविदास वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे. 14 तेव्हा यरूशलेमेमध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरूशलेमेच्या लोकांस तो मारून टाकेल. 15 तेव्हा राजाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत. 16 आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्नी होत्या त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले. 17 राजा आणि त्याच्या मागोमाग सर्व लोक निघून गेले अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले. 18 त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करेथी, पलेथी आणि सहाशे गित्ती राजामागोमाग चालत गेले. 19 गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे. 20 तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार तू कशाला भटकत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर, तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो. 21 पण इत्तय राजाला म्हणाला परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आता जगणे मरणे तुमच्याबरोबरच. 22 दावीद इत्तयला म्हणाला, मग चल तर, किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ. तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-मनुष्यांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला. 23 सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला मग सर्वजण वाळवंटाकडे निघाले. 24 सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा कोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा कराराचा कोश खाली ठेवला. यरूशलेमेमधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून अर्पणे अर्पित होता. 25 राजा दावीद सादोकाला म्हणाला, हा देवाचा कोश यरूशलेमेला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरूशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल. 26 पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल. 27 पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा. 28 हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते, त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो. 29 तेव्हा देवाचा कोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरूशलेमेला परतले आणि तिथेच राहिले. 30 दावीद शोक करत जैतूनाच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले तेही रडत होते. 31 एकाने दावीदाला सांगितले अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे. तेव्हा दावीदाने देवाची करूणा भाकली तो म्हणाला, परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे. 32 दावीद डोंगरमाथ्यावर पोहोचला येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे. त्या वेळी हूशय अर्की त्यास भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता. त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती. 33 दावीद हूशयला म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर एवढे लोक आहेत त्यामध्ये आणखी तुझा भार. 34 पण तू यरूशलेमेला परतलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिळवू शकशील. अबशालोमला सांग, महाराज मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, पण आता तुमची सेवा करीन. 35 सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा. 36 सादोकाचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा. 37 तेव्हा दावीदाचा मित्र हूशय यरूशलेमेमध्ये परतला. अबशालोम ही तेथे आला. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.