Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

2 पेत्र 2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


खोटे संदेष्टे व पापी जीवनक्रम

1 पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.

2 पुष्कळजण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल.

3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.

4 कारण जर देवाने पाप करणार्‍या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले;

5 जर त्याने पहिले जग राखले नाही पण अभक्तांच्या त्या जगावर जलप्रलय आणून, नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्यालाच केवळ इतर सात जणांसहित सुरक्षित ठेवले;

6 जर त्याने सदोम व गमोरा या नगरांची राख करून त्यांना नाशाची शिक्षा दिली व पुढे जे लोक अभक्तीने वागतील त्यांच्यासाठी त्यांचे उदाहरण ठेवले,

7 आणि तेथील दुराचार्‍यांचे, कामातुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले;

8 कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यात राहून पाहत असता व ऐकत असता, त्यांच्या स्वैराचाराची कृत्ये पाहून, दिवसानुदिवस, त्याच्या नीतिमान जिवाला यातना होत होत्या;

9 तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांस शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.

10 विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक, सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत.

11 पण त्याच्यापेक्षा शक्तीने व सामर्थ्याने मोठे असलेले देवदूतसुद्धा, त्यांच्याविरुद्ध परमेश्वरापुढे निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत.

12 पण जे निर्बुद्ध प्राणी, नैसर्गिकरीत्या, धरले जाण्यास व मारले जाण्यास जन्मास येतात त्याच्याप्रमाणे हे स्वतःला न समजणार्‍या गोष्टींविषयी वाईट बोलतात; आणि स्वतःच्या भ्रष्टतेत नाश पावतील.

13 त्यांचे वाईट होईल ह्यात त्यांना त्यांच्या वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल. ते दिवसाच्या ख्यालीखुशालीत सुख मानतात; ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर ते जेवतात तेव्हा ते दंगली करून मजा करतात.

14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली आहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांस मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;

15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्यास अनीतीचे वेतन प्रिय वाटले.

16 तरी त्याच्या अनाचाराचा निषेध झाला; मुक्या गाढवीने मनुष्यासारख्या आवाजात बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला.

17 ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्‍याने विखरलेले ढग आहेत आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे.

18 कारण जेव्हा, चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.

19 त्यांना ते स्वातंत्र्याचे वचन देतात तेव्हा स्वतः दुष्टतेचे दास असतात कारण ज्याच्याकडून कोणी जिंकलेला आहे त्याच्या दासपणातही तो आणलेला आहे.

20 कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.

21 कारण त्यांना नीतिमत्त्वाचा मार्ग समजल्यावर, त्यांनी दिलेली पवित्र आज्ञा सोडून देऊन त्यांनी मागे फिरावे, हे होण्यापेक्षा, त्यांना त्याचे ज्ञान झाले नसते तर त्यांच्यासाठी ते बरे झाले असते.

22 कारण कुत्रे आपल्या ओकीकडे पुन्हा फिरते आणि धुतल्या नंतर डुकरीण लोळण्यासाठी घाणीत शिरते, ही जी खरी म्हण तिच्याप्रमाणे हे त्यांना झाले आहे.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan