२ राजे 12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीयहूदाचा राजा यहोआश ह्याची कारकीर्द 2 इति. 24:1-14 1 येहूच्या सातव्या वर्षी योवाश राज्य करू लागला. त्याने यरूशलेमेवर चाळीस वर्षे राज्य केले. योवाशाच्या आईचे नाव सिब्या, ती बैर-शेबा इथली होती. 2 योवाशाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता. 3 पण उंचवट्यावरील पुजास्थळांना त्याने धक्का लावला नाही. लोक यज्ञ करायला, धूप जाळायला तिथे जातच राहिले. 4 योवाश याजकांना म्हणाला, “परमेश्वराच्या मंदिराची पवित्र वस्तूंचा जो काही येईल तो सर्व पैसा, कोणी शिरगणती झाली त्याचा पैसा, आणि परमेश्वराच्या घरात आणायला कोणाच्या मनात येईल तो सगळा पैसा. 5 याजकाने आपापल्या करदात्यांच्या कडून मिळालेले पैसे घ्यावे आणि परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेत तर या पैशातून तिची दुरुस्ती करावी.” 6 पण योवाश राजाच्या तेविसाव्या वर्षीही याजकांनी मंदिराची दुरुस्ती केली नाही. 7 तेव्हा मात्र राजा योवाशाने यहोयाद आणि आणखी काही याजक यांना बोलावणे पाठवले. त्यांना तो म्हणाला, “अजूनही तुमच्या हातून मंदिराची दुरुस्ती का झाली नाही? आता आपापल्या लोकांकडून पैसे घेणे आणि ते पैसे वापरणे बंद करा. त्या पैशाचा विनियोग मंदिराच्या दुरुस्तीसाठीच झाला पाहिजे.” 8 याजकांनी लोकाकडून पैसे घेण्याचे थांबवण्याबद्दल आपली सहमती दर्शवली खरी पण मंदिराची दुरुस्ती करायची नाही असेही ठरविले. 9 तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाकणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वरास वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत. 10 मग लोकही परमेश्वराच्या मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत. 11 मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यामध्ये सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते. 12 दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडविणे आणि परमेश्वराच्या मंदिरासाठी दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात. 13 लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण ते चांदीची उपकरणी, कात्र्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके त्या पैशातून करण्यात आले नव्हते, 14 तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करत. 15 कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशोब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते. 16 परंतु दोषार्पणाचा पैसा व पापार्पणाचा पैसा परमेश्वराच्या घरात त्यांनी आणला नाही, कारण तो याजकांचा होता. 17 हजाएल अरामाचा राजा होता. तो गथवर स्वारी करून गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरूशलेमेवर चढाई करायचा विचार करु लागला. 18 योवाशाच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वरास बऱ्याच पवित्र गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशानेही बरेच काही परमेश्वरास दिले होते. योवाशाने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामाचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरूशलेमेला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही. 19 “यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात योवाशाच्या थोर कृत्यांची नोंद आहे. 20 योवाशाच्या कारभाऱ्यांनी योवाशाविरुध्द कट केला. शिल्ला येथे जाणाऱ्या रस्तावरील मिल्लोच्या घरात त्यांनी योवाशाचा वध केला. 21 शिमाथचा मुलगा योजाखार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशाचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले. दावीद नगरात लोकांनी योवाशाला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशाचा मुलगा अमस्या त्यानंतर राज्य करु लागला. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.