Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

२ करिंथ 11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


प्रेषित म्हणून त्याचा हक्क

1 माझी इच्छा आहे की, तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन करावा. पण तो तुम्ही सहन करीतच आहात.

2 कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हास शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.

3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील.

4 कारण, जर कोणीही येऊन, आम्ही ज्याची घोषणा केली नाही अशी दुसर्‍या येशूची घोषणा केली किंवा तुम्हास मिळाला नव्हता असा दुसरा आत्मा तुम्ही स्वीकारता किंवा तुम्ही स्वीकारले नाही असे दुसरे शुभवर्तमान तुम्ही स्वीकारता तर तुम्ही त्यांचे सहन करता.

5 पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी नाही.

6 आणि मी भाषण करण्यात अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही. आम्ही हे तुम्हास सर्व गोष्टीत, सर्व प्रकारे, प्रकट केले.

7 तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हास फुकट सांगितले यामध्ये मी पाप केले काय?

8 तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले.

9 आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.

10 ख्रिस्ताचे सत्य माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कोणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही.

11 आणि का? कारण मी तुम्हावर प्रिती करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रीती करतो.

12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यामध्ये ते आमच्यासारखे दिसावेत.

13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.

14 आणि यामध्ये आश्चर्य नाही कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो.

15 म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.


पौल व त्याचे विरोधी ह्यांची तुलना

16 मी पुन्हा म्हणतोः कोणीही मला मूढ समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन.

17 मी हे बोलत आहे ते प्रभूला अनुसरून बोलत नाही. तर या अभिमानाच्या धीटपणाने, जणू मूर्खासारखे बोलतो.

18 जसे बरेच लोक दैहिक गोष्टीविषयी अभिमान मिरवतात, तसा मी पण अभिमान मिरवीन.

19 तुम्ही शहाणे असल्याने मूढांचे आनंदाने सहन करता!

20 वस्तुतः जे कोणी तुम्हास दास करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता.


पौलाने सोसलेली संकटे व अडचणी

21 स्वतःला हिणवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).

22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीहि आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीहि आहे.

23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.

24 पाच वेळेला यहूद्यांकडून मला चाबकाचे एकोणचाळीस फटके बसले.

25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला.

26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते.

27 मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो,

28 या सर्व गोष्टीशिवाय दररोज माझ्यावर येणार दबाव म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता.

29 कोण दुर्बळ झाला असता तर मी दुर्बळ होत नाही काय? कोण दुसऱ्याला पापात पाडण्यास कारण होतो आणि मला संताप होत नाही?

30 जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन.

31 देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही.

32 दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता.

33 पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan